मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. या गाईडलाईन्सनुसार जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पास अट रद्द करण्यात आली आहे. मात्र धार्मिक स्थळं, जिम तसेच रेस्टॉरंटला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र “याबाबतचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल,” अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. (Anil Parab on Maharashtra Unlock 4 Guidelines)
“राज्यातील जिम आणि हॉटेल्स-लॉजमध्ये फरक आहे. हॉटेल्स लॉज सुरु केली असली तरी ते 100 टक्के भरतील असं नाही. कारण अर्थचक्र अजून पूर्णपणे सुरु झालेलं नाही. जिममध्ये लोकांना येणारा घाम, जोरजोरात होणारा श्वासोच्छवास या सर्व गोष्टी लक्षात घेता जिम कशा सुरु करता येतील याबाबत निर्णय घेतला जाईल,” असे अनिल परब यांनी सांगितले.
जिम, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं यांच्याबाबतचा निर्णय घेण्याचा विषय या आठवड्यात सुरु होईल. रेल्वेबाबतचा निर्णय सर्वप्रथम केंद्र सरकार घेईल. मग राज्य सरकार घेईल. दिल्लीत मेट्रो सुरु होतं आहे. पण त्याचे परिणाम काय होतात, असेही ते म्हणाले.
“मुंबईत ट्रेनमध्ये गर्दी होते. लोक जवळजवळ बसतात. त्याचे काय परिणाम होतात. या गोष्टींचा विचार करुनच मग निर्णय होईल,” असेही त्यांनी सांगितले.
“राज्यातील ई-पास रद्द करण्याची मागणी गेले अनेक दिवस होत होती. एसटीमध्ये ई-पास रद्द केला होता. एसटीतून कोण कुठे जातं याची नोंद होत होती. पण खाजगी वाहनातून प्रवाशांची ती नोंद होत नव्हती. त्यामुळे आम्ही ई-पास ठेवला होता. पण महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारते आहे. अर्थचक्र चालण्याच्या दृष्टीने लोकांची विविध जिल्ह्यात वाहतूक महत्वाची आहे. त्यामुळे ई पास रद्द केला आहे,” असेही अनिल परब यांनी सांगितले.
“वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी सुद्धा दिली. याचा अर्थ सरकारने मंदिरे उघडली असा नाही. आम्ही सकारात्मक आहोत. मंदिरे आमच्या श्रद्धेचा भाग आहेत. ती उघडली गेली पाहिजेत. पण ती उघडताना त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची काळजी घेणं गरजेचं आहे. ते सगळे निकष तयार करून मंदिरे उघडण्याचा प्रस्ताव सरकार आणेल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ही अत्यंत दु: खद घटना आहे. ते अतिशय विद्वान होते. त्यांनी आपलं पूर्ण करिअर संघर्षातून घडवलं. एक आदर्श नेता आपल्यातून गेला. शिवसेनेच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनिल परब यांनी आदरांजली व्यक्त केली.
राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मी त्यावेळी मातोश्रीत उपस्थित होतो. त्यांना जवळून पाहण्याचा योग होता. त्यांच्या निवडणुकीपाठोपाठ माझी विधानपरिषदेची निवडणूक होती. ते अतिशय विद्वान होते. त्यांचे न्यूक्लियर डिलवरचे भाषण मी ऐकले होते. त्यांनी ज्याप्रकारे सरकारची बाजू मांडली आज संसदीय कार्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडताना आपल्या सरकारची बाजू कशी मांडायची हे मी त्यांच्यात बघितलं. त्यांची संसदीय भाषणे प्रेरणादायी आहेत, तुम्हाला वाटचाल शिकवतात, अशी आठवणही अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab on Maharashtra Unlock 4 Guidelines)
संबंधित बातम्या :
Unlock 4 | ई-पास रद्द, हॉटेल सुरु, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद, राज्य सरकारची नियमावली
‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…