धावत्या ट्रेनमध्ये प्रसव वेदना, डॉक्टर मिळेना, टीसीकडूनच महिलेची प्रसुती

| Updated on: Jun 14, 2019 | 1:06 PM

रेल्वेत प्रवास करत असताना एका महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. गाडीत डॉक्टर न मिळाल्याने टीसीने स्वत: इतर प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती केली.

धावत्या ट्रेनमध्ये प्रसव वेदना, डॉक्टर मिळेना, टीसीकडूनच महिलेची प्रसुती
Follow us on

नवी दिल्ली : रेल्वेत प्रवास करत असताना एका महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. याची माहिती तात्काळ गाडीत उपस्थित टीसीला देण्यात आली. त्यानंतर टीसींनी संपूर्ण गाडीत कुणी डॉक्टर आहे का याचा शोध घेतला. मात्र, कुणीही डॉक्टर न मिळाल्याने या टीसीने स्वत: इतर प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती केली.

दिल्ली विभागातील या टीसीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. टीसी एच. एस. राणा हे भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असते याचं जिवंत उदाहरण आहेत.

रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व प्रवासी गाडीत झोपलेले होते. तेव्हा एका गर्भवती महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. त्यानंतर टीसी एच. एस. राणा यांना या घटनेची माहिती देण्यात आली. टीसी राणा यांनी गाडीत कुणी डॉक्टर आहे का, यासाठी शोधाशोध केली. मात्र, गाडीत कुणीही डॉक्टर उपस्थित नव्हता. महिलेचा असह्य त्रास राणा यांना बघवत नव्हता आणि कुठली आरोग्य सेवाही तात्काळ मिळणे शक्य नव्हतं.

त्यामुळे अखेर राणा यांनी स्वत: या महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. गाडीतील इतर प्रवाशांच्या मदतीने राणा यांनी महिलेची यशस्वी प्रसुती केली. राणा यांच्या या कामगिरीने रेल्वे प्रशासन अत्यंत आनंदी आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करत राणा यांच्या माणुसकी आणि चांगल्या कामाचं कौतुक केलं.

रेल्वेत प्रसुती होण्याची ही काही पहिली वेळ नाही. नुकतचं जलपायगुडीमध्ये अगरतला-हबीबगंज एक्स्प्रेसमध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. यावेळीही गाडीत डॉक्टर नसल्याने तिघांनी महिलेची प्रसुती केली होती.