तुळजापूर: साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीची आज दिवाळी पाडव्यानिमित्त शिवकालीन दागिन्यांत पूजा करण्यात आली. तुळजाभवानीला वर्षातून सहा वेळेस शिवकालीन दागिने घातले जातात. आजच्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. देवीला घातल्या जाणाऱ्या शिवकालीन दागिन्यांमध्ये हिरे, माणिक, मोती आणि पाचूनी बनवलेला जरीटोप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीच्या चरणी अर्पण केलेली 108 मोत्यांची माळ आज घातली जाते. (Historical ornament worship of Goddess Tulja Bhavani today)
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरं बंद होती. पण ‘ही श्रींची इच्छा’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून सर्व मंदिरं सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाऊबिज आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून तुळजाभवानीचं मंदिरही भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली आहे. राज्यातील भाविकांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविकही देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात येतात.
तुळजाभवानी मातेचे मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर खुलं झाल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब दाखल झाले आहेत. आई भवानीच्या दर्शनाची आतुरता होती ती पूर्ण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.
अक्कलकोट इथलं स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 8 महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं.
ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश
Historical ornament worship of Goddess Tulja Bhavani today