पुणे : “माझा भाऊ यंत्रणेच्या असुविधेमुळे गेलाय, कोटीचा प्रोजेक्ट उभा केलाय, पण अॅम्ब्युलन्स मिळाली नाही” अशी उद्विग्नता ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केली. घरचा डबा दादापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Sister slams government)
कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 42 व्या वर्षी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.
“दादाचा प्रत्यक्ष बेड नंबर आणि सिस्टममध्ये असलेली नोंद यात फरक होता. मला डॉक्टरांना चार वेळा फोन करुन कन्फर्म करावे लागले. त्यांनी पाठवलेल्या फोटोमध्ये f03 हा नंबर दिसत होता. माझा भाऊ यंत्रणेच्या असुविधेमुळे गेला. कोट्यवधी रुपयांचा प्रोजेक्ट उभा केला, पण कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स वेळेत मिळाली नाही” असा संताप पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केला.
“रुग्णालयाने तुम्ही रुग्णाला घरचे जेवण देऊ शकता, असे सांगितले. दादाला भूक लागली होती, त्याने घरचा डबा आणायला सांगितला, मी काल रात्री आठ वाजता डबा दिला, पण शेवटपर्यंत तो त्याला मिळालाच नाही, दुपारी तीन वाजता दिलेली औषधंही मिळाली नाहीत. तो ना त्याला मिळाला, ना आमच्यापर्यंत रिटर्न पोहोचला. मी 20-25 वेळा डॉक्टरांना विचारले” असेही पांडुरंग रायकर यांची बहीण म्हणाली.
पाहा व्हिडीओ :
नेमकं काय घडलं?
पांडुरंग रायकर यांची कारकीर्द
पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.
पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.
VIDEO: Pandurang Raykar | पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेशhttps://t.co/KF190RpzwW#PandurangRaykar #Corona #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2020
संबंधित बातम्या :
बूम सॅनिटाईज, घाईघाईत कोव्हिड सेंटरचं उद्घाटन, पांडुरंगबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गप्प
होय, पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो : महापौर मुरलीधर मोहोळ
पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश
संयत रिपोर्टर, शांत स्वभाव, ‘टीव्ही 9’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन
(TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Sister slams government)