पुणे/रायगड : निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्रात मोठे तांडव केल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे अनेक घरं उडून गेली आणि झाडंही उन्मळून पडली. मात्र, दुसरीकडे या वादळाने काही प्रमाणात जीवितहानी देखील केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील खेड तालुक्यात वादळात घर उडाल्याने एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. (two dies due to Nisarga cyclone)
चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्याने अलिबाग तालुक्यात बंगलेवाडी उमटे येथे विजेचा खांब कोसळला. यामध्ये दशरथ बाबू वाघमारे (58) हे जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तेथे वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. मात्र उपचारादरम्यान दशरथ वाघमारे यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पुण्यात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भागातील वाफगाव या गावात तानाजी अनंता नवले आणि नारायण अनंता नवले यांचे घर वादळात उडाले. यात त्यांची आई मंजाबाई अनंता नवले (वय 65) यांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त घरातील 5 माणसे जखमी झाली आहेत. यामध्ये नारायण नवले (वय 45) यांना युनिकेअर हॉस्पिटल चाकण येथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तानाजी अनंत नवले आणिघरातील इतर जखमींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले कोविड 19 उपचार केंद्राचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तेथील रुग्णांना देखील इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसह अलिबाग, मुरुड आणि पुणे भागातही जोरदार पावसासह वारे वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. कुलाबा, फोर्ट, मुंबई सेंट्रल, काळाचौकी, दादर भागात रस्त्यावरील झाडं कोसळून वाहनांचं आणि काही ठिकाणी दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या माध्यमातून उन्मळून पडलेली झाडं बाजूला करण्याचं काम सुरु आहे.
(two dies due to Nisarga cyclone)