नवी मुंबई : महाडमधील दुर्घटनाग्रस्त इमारत बांधणाऱ्या डेव्हलपर्सच्या पनवेल मनपा क्षेत्रातीलही दोन इमारती अतिधोकादायक असल्याचं उघड झालं आहे (Dangerous building of Kohinoor Builder in Panvel). महाडमधील तारिक गार्डन ही इमारत बांधकाम व्यावसायिकाच्या निकृष्ट कामामुळे कोसळली होती. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ही इमारत कोहिनूर डेव्हलपर्सचा मालक फारुक मिया महम्मद काझी यांनी बांधली होती. त्यांच्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील 4 इमारती आहेत. या 4 पैकी 2 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आलीय.
पनवेल महानगरपालिकेने याबाबत तात्काळ स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास इमारती खाली करण्याबाबतच्या नोटिसा देण्यात येणार आहेत. महाड येथील दुर्घटनेतील दोषी बांधकाम व्यावसायिक तळोजा येथील रहिवासी असल्याचे उघड झालं. यानंतर त्वरित पनवेल महानगरपालिका क्षेत्रात त्याने बांधलेल्या बांधकामांची शोधमोहीम हाती घेतली. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबत गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
महाड येथील तारिक गार्डन ही 5 मजली इमारत 24 ऑगस्ट 2020 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली होती. या इमारतीचे बांधकाम करणारा विकसक कोहिनूर डेव्हलपर्स हा तळोजा येथील आहे. त्यामुळे त्याने विकसित केलेल्या इमारतींचा शोध घेण्यात आलाय. त्यांनी विकसित केलेल्या तळोजा फेज 1 मधील तारिक हेरिटेज, तारिक सफायर आणि तारिक पॅराडाईज या 3 इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. तारिक हेरिटेज ही इमारत साधारणपणे 12 वर्षांपूर्वी, तर इतर 2 इमारती 6 वर्षांपूर्वी बांधकाम केल्या आहेत. तिन्ही इमारतींना तडे गेलेले आहेत. यापैकी तारिक हेरिटेज या इमारतीची अंशतः दुरुस्ती सुरू असली, तरी इमारत अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून आले.
तळोजा फेज 1 हे क्षेत्र नियोजनासाठी सिडकोकडे असल्यामुळे या सर्व इमारतींना बांधकामासाठी आणि इतर सर्व परवानग्या सिडको प्रशासनामार्फत दिल्या जातात. त्यामुळे या इमारतींचा सविस्तर तपशील सिडको प्रशासनाकडून मागविण्यात येत आहे. सर्व इमारतींचा दर्जा सकृतदर्शनी सुमार असल्याचे दिसून आल्याले आहे. त्यामुळे संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी या बांधकामांना धोकादायक इमारती असल्याबाबत नोटिसा दिल्या. विकासकांना तात्काळ स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे अन्यथा इमारती खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संबंधित विकासकाचे प्लॉट नंबर 181 सेक्टर 2 तळोजा फेज 1 येथे आणखी एक बांधकाम सुरु आहे. त्यांच्या पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेल्या या दुमजली इमारतीच्या बांधकामांमध्ये रस्त्याच्या बाजूला दुकान गाळे काढण्यात आलेले आहेत. या तिन्ही दुकान गाळ्यांच्या मध्य भागावरील प्रत्येकी एक असे एकूण 3 कॉलम कापून टाकण्याची अत्यंत गंभीर बाब प्रत्यक्षस्थळ केलेल्या पाहणीत समोर आली. अशा कृत्यामुळे या इमारतीच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीवर काय परिणाम होईल हे तपासणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे याबाबतही सिडको प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Mahad Building Collapse | महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Dangerous building of Kohinoor Builder in Panvel