जालना : जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. अबंड तालुक्यातील वलखेडामधील ही घटना आहे. शिवम धोत्रे (9) आणि शिवराज धोत्रे (7) अशी या दोघांची नावं आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जालन्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे व त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम करतात. काल (21 मे) रवींद्र धोत्रे हे आपल्या दोन्ही मुलांसोबत दगडीच्या खाणीजवळ गेले होते. दुपारी रणरणतं ऊन असल्याने ते दोघेही दगडाच्या खाणीजवळ बसले होते. मात्र त्याचदरम्यान अचानक जिलेटीनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे खाणीजवळ टेकून बसलेले शिवम आणि शिवराज दोघेही दहा फूट अंतरावर उडाले. हा स्फोट इतका तीव्र होता की, या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रवींद्र धोत्रे व त्यांची पत्नी खाणीजवळील ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजूला दगड भरण्याचे काम करत असल्याने त्यांचा जीव वाचला
धोत्रे कुटुंब हे बीडमधील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव या गावात राहतात. गेल्या दोन महिन्यापासून ते काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या जालन्यातील अबंड तालुक्यातील वलखेडा शिवारात दगड खाणीवर दगड फोडण्याचे काम करतात.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.