श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती गंभीर आहे. पुलवामा जिल्ह्याच्या दलिपोरा परिसरात ही चकमक सुरु आहे.
या चकमकीत तेथील एक सामान्य नागरिकही जखमी झाला आहे. या व्यक्तीच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला पुलवामा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या या नागरिकाची प्रकृती स्थिर आहे.
Jammu & Kashmir: An exchange of fire between terrorists and security forces began in Dalipora area of Pulwama earlier this morning. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/BW3aFWelN2
— ANI (@ANI) May 16, 2019
काही वेळापूर्वीच एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मात्र, त्याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
सुरक्षा दलाला दलिपोरा भागात काही दहशवादी लपलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत सुरक्षा दलाचे जवान दहशतवादी लपलेल्या संशयास्पद ठिकाणी पोहोचले. तेव्हा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे.
गेल्या रविवारीही (12 मे) जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या शोपियां येथील हिंद सीतापूर परिसरात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या परिसराला घेराव घालून शोध अभियानाला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान जवानांवर दहशवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर जवानांनीही गोळीबाराचं प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं.