मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलताना माझ्या सरकारच्या काळात हा कायदा होत आहे यावर आनंद व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुमची मुलं इंग्रजी शाळेत का शिकली? असा प्रश्न करत होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिलं (Uddhav Thackeray on his son and English Medium). कोणत्याही भाषेचा दुस्वास करणं मला शिकवलेलं नाही. माझी मुलं उत्तम मराठी बोलतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते मराठी सक्ती विधेयकावर विधानपरिषदमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकली. त्यावेळी आमच्यावर टीका झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका झाली. हे मराठी, मराठी करतात आणि यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात, अशी टीका करण्यात आली. कोणत्याही भाषेचा दुस्वास करणं हे मला माझ्या आई-वडिलांनी आणि आजोबांनी मला शिकवलेलं नाही. मराठीचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले होते. माझी मुले उत्तम मराठी बोलतात.”
…तर पुरावे मागणारे जन्माला आले असते का? : उद्धव ठाकरे
जर मराठी भाषा नसती, जर मराठी भाषिक प्रांत नसता, जर मराठी भाषेच्या प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दैवतं जन्माला आली नसती तर मराठी अभिजात भाषा झाली पाहिजे म्हणून पुरावे मागणारे जन्माला आले असते का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आपण कुणाकडे पुरावे मागतो आहे? याचं भान ठेवा, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
मराठी भाषेतील पुत्राने देशाची घटना लिहिली, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे सांगणारा मराठी भाषेतील सुपुत्र, इंग्रजांना वठणीवर आणणारी भाषा मराठीच, मराठीचं मूळ शोधायला जाणं हा तिचा अपमान आहे. मराठी भाषा सक्तीची करण्याची वेळ का आली याचा विचार करायला हवा. कर्नाटकमध्ये कानडीची सक्ती करतात तशी मला सक्ती नको आहे, असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Uddhav Thackeray on his son and English Medium