मुंबई : येस बँकेतील आर्थिक संकटाचा मोठा फटका सामान्य ग्राहकांसोबतच महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांनाही बसला आहे (Uddhav Thackeray on YES Bank Crisis). राज्यातील विविध महानगरपालिकांचे जवळपास 1125 कोटीहून अधिक पैसे येस बँकेत अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतर्कता म्हणून राज्य सरकारने विविध खासगी बँकांमधील ठेवींची माहिती मागवली आहे. असा हिशोब मागण्याची राज्य सरकारची ही दुसरी वेळ असून येस बँक आर्थिक संकटात सापडल्यामुळे ही काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य सरकारने आपल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था, राज्याचे सार्वजनिक विभागांचे उपक्रम, स्वायत्त संस्था आणि इतर सरकारी विभागांचे येस बँकेसह इतर कोणत्या खासगी बँकेत किती पैसे आहेत याची माहिती मागितली आहे. यात वेतन खात्यांचाही समावेश आहे. मागील काही काळात राज्य सरकारने एक्सिक बँकेतील वेतन खाती मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय बँकेत वर्ग केली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या आदेशात संबंधित विभागांना पैसे ठेवण्यासाठी खासगी बँकांऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा उपयोग करण्यास सांगितलं आहे. राज्यातील नाशिक महानगरपालिका, नाशिक स्मार्ट सिटी प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवडचे येस बँकेत जवळपास 1125 कोटी रुपये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्तकता म्हणून उद्धव ठाकरेंनी ही माहिती मागवल्याचं सांगितलं जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे (PCMC) 800 कोटी, नाशिक महागरपालिकेचे (NMC) 310 कोटी आणि नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NMHCDCL) 15 कोटी रुपये येस बँकेत जमा आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी येस बँकेतील आपली जमा रक्कम 1,100 कोटीवरुन 800 कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. या व्यतिरिक्त इतर बँकेत त्यांचे 4,000 कोटी रुपये जमा आहेत.
हार्डिकर म्हणाले, “भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर आम्ही ऑनलाईन ट्रान्सफर आणि प्रमुख बँकर म्हणून बँक ऑफ बडोदाची निवड केली आहे. त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही.”
दुसरीकडे नाशिक महानगरपालिका आणि नाशिक स्मार्ट सिटी प्राधिकरण मात्र काळजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी अधिकाऱ्यांनी यामुळे महानगरपालिकेच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पोलिस विभागाचे खाते अॅक्सिस बँकेतून आणि पंजाब अँड सिंड बँकेतून (पीएसबी) स्थानांतरित करण्याचा विचार करत आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Uddhav Thackeray on YES Bank Crisis