इस्लामाबाद : 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे वृत्त आहे. दाऊदसोबतच त्याच्या पत्नीलाही ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे. (Dawood Ibrahim wife test positive for coronavirus)
पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा उल्लेख आहे.
दाऊद इब्राहिम कोण?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.
हेही वाचा : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या आणखी 14 संपत्ती जप्त होणार
दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो. भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्या डोक्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.
दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल. (Dawood Ibrahim positive coronavirus)