नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची शक्यता आहे. कलम 370 हटवल्यानंतर अमित शाह काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शाह नागरिकांना संबोधित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जम्मू-काश्मीरमधील सर्व पंचायतमध्ये 15 ऑगस्टला राष्ट्रध्वज फडकवला जाईल. अमित शाहांनी मंगळवारी काँग्रेसला काश्मीर मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. तसेच, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यासाठी आपण प्रणांची आहुती द्यायलाही तयार आहोत, असं अमित शाह यांनी म्हटलं.
अमित शाह यांनी सोमवारी (5 ऑगस्ट) लोकसभेत जम्मू-काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव आणि विधेयक मांडले. हा मुद्दा राजकीय नाही, हा कायदा घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींवर आधारित आहे. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतींच्या आदेशावरुन मांडण्यात आला आहे, तर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 नुसार राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याची तरतूद आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.
15 ऑगस्टसाठी सेना सज्ज
जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थिती पाहता कमांडिंग इन चीफ जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरच्या गुप्त आणि सुरक्षा यंत्रणांची बैठक पार पडली. कुठल्याही आपत्कालिन स्थितीशी दोन हात करण्यात सुरक्षा यंत्रणा किती तयार आहेत, याची समीक्षा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. शांतता राखण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कुठल्याही अनुचित स्थितीला सांभाळण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असं लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
पाकव्याप्त काश्मीरही आमचाच, जीवाचं रान करेन : अमित शाहांची गर्जना
काश्मीर हा भारत-पाकचा मुद्दा, मग आता एकट्या भारताचा कसा? काँग्रेसचा सवाल, अमित शहांनी धुतलं
गुंतवणुकीसाठी काश्मीरचं मैदान मोकळं, भल्या मोठ्या घराची किंमत केवळ 9 लाख रुपये!