नवी दिल्ली : लोकांनी शिवशाही बसमधले ब्लँकेट पळवले, तेजस एक्स्प्रेसमधील हेडफोन चोरले आणि आता देशातली सर्वात वेगवान ट्रेन 18 वर दगडफेक करण्यात आली. दिल्ली ते आग्रा मार्गावर या ट्रेनची चाचणी घेण्यात येत असताना समाजकंटकांनी हा प्रकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला 29 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
दिल्ली ते आग्रा मार्गावर ट्रेन 18 180 किमी प्रति घंटा वेगाने धावत होती. आधुनिक रेल्वे बनवणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे मुख्य डिझाईनर मोटरमनच्या डब्यात होते. 181 किमी प्रति घंटा वेग नोंदवण्यात आला. पण काही समाजकंटकांनी ट्रेनवर दगड फेकला, ज्यात डब्याची काच फुटली आहे. लवकरच या समाजकंटकांना पकडलं जाईल, असं ट्वीट आयसीएफचे संचालक सुधांशू मनू यांनी केलं.
आयसीएफकडून शंभर कोटी रुपये खर्च करुन देशातली सर्वात वेगवान ट्रेन बनवण्यात आली आहे. या ट्रेनला तयार करण्यासाठी 18 महिने लागले, ज्यामुळे नावही ट्रेन 18 असं देण्यात आलं. या ट्रेनने चाचणीदरम्यान 180 किमीचा वेग गाठून देशातली सर्वात वेगवान ट्रेन होण्याचा मान मिळवला आहे.
काय आहे ट्रेन 18 चं वैशिष्ट्य?
ही एक अत्याधुनिक ट्रेन आहे, ज्यात वायफायपासून सर्व सुविधा देण्यात येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे, या ट्रेनला इंजिन नसेल. लोकल ट्रेनप्रमाणे दोन्ही बाजूने ड्रायव्हिंग कॅप्स असतील, ज्यामुळे दोन्ही बाजूने ही ट्रेन चालेल. राजधानी आणि शताब्दी या ट्रेनच्या पंक्तीत हे ट्रेन बसणार आहे.
बुलेट ट्रेनसारखा लूक असणारी ही ट्रेन राजधानी आणि शताब्दी या ट्रेनच्या वेगाने चालणार आहे, ज्यामुळे वेळेत 10 ते 15 टक्क्यांची बचत होईल.