सिंधुदुर्ग : यंदा अनियमित वेळी होत असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळबागांना अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण बागा जोपासण्यासाठी केलेला खर्चही वाया जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर होतेच पण बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू शेतीचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागेचे क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी पिक पध्दतीमध्ये बदल केला आहे. परंतू, वातारणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होत आहे. सध्या आंब्याला मोहर लागला आहे तर काजूही बहरात आहे. असे असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहे.
अवकाळी पावसाचा परिणाम आंबा आणि काजू पिकावर होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात मोहोर आला आहे तर इतर भागात पालवी फुटलेली आहे. या पावसामुळे मोहोर गळून जाऊ शकतो व पालविला कीड व बुरशी धरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे पीकाला ही उशीर होणार. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी जंतू नाशक फवारणी करणं गरजेचं असल्याचे कृषितज्ञ पंकज दळी यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण तर होतेच पण बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून सूर्यदर्शन देखील झाले नाही. वातावरणात काळोख दाटला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, भर हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत असून वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम फळबागांवर होत आहे. आंब्याच्या मोहर गळून पडत आहे तर काजू शेतीचे नुकसान होत आहे. ऐन बहरात असतानाच पावसाने कहर केलेला आहे. त्यामुळे उत्पादनाबाबत साशंका व्यक्त होत आहे.
ऐन फळधारणा होण्याच्या प्रसंगीच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आंब्याचा मोहर गळत आहे तर काजुच्या पिकाची मोडतोड होऊ लागली आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे फळबागा आडव्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भातशेतीची कामे संपलेली होती. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले नाही पण जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील बहुतांश गावात,वैभववाडी तालुक्यात व कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावली.