सोलापूर : स्वप्नपूर्तीचं समाधान काय असतं ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दगडे कुटुंबीय अनुभवत आहेत. बँड पथकात वाजंत्री असलेले मोहन दगडे यांच्या मुलाने यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या आयएफएस म्हणजेच भारतीय वन सेवा परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवली आहे. गुरुवारी लागलेल्या या निकालानंतर जीवन दगडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर चालूच आहे, पण जीवन यांच्या वडिलांसाठी मुलाचं यश हे या जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे.
जीवन हा सुर्डी या छोट्याशा गावातला मुलगा. गुरुवारी जेव्हा आयएफएसचा निकाल लागला, तेव्हा त्याचे वडील मोहन दगडे वैराग येथील बँड पथकात कामावर होते. बातमी समजताच त्यांनी गाव गाठलं. गावात येण्यापूर्वीच त्यांच्या मुलावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. हे चित्र पाहून मोहन दगडे अक्षरशः भारावून गेले.
“आणखी दोन पोरांना अधिकारी करुनच बँड सोडणार”
मुलाच्या यशावर बोलताना मोहन दगडे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. मुलगा मोठा साहेब झालाय हे मोहन दगडे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय. गेल्या 25 वर्षांपासून मोहन दगडे यांनी बँड पथकात काम केलंय. या मेहनतीचं सार्थक झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. पोराने पांग फेडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गावातून शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. दगडे कुटुंबीयांनी ही खुशखबर सर्व नातेवाईकांनाही कळवली.
मोहन दगडे यांनी मुलाच्या या घवघवीत यशानंतर गावात पेढे वाटले. कुळदैवेत असलेल्या भैरोबाला नारळ फोडून आनंद साजरा केला. मोहन दगडे यांनी पोराला कधीही गरीबीची झळ न लागू देता शिकवलं. पोरानेही कष्टाचं चीज केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. मोहन दगडे यांची अजून दोन मुलं अनुक्रमे औरंगाबाद आणि पुण्याला शिकतात. या दोन पोरांना अधिकारी केल्याशिवाय बँड वाजवणं सोडणार नाही, असंही ते म्हणाले.
गरीबीवर मात करुन घवघवीत यश
जीवनचे वडील मोहन दगडे हे गेल्या 25 वर्षांपासून वैराग येथील बँड पथकात कलाटी हे वाद्य वाजवतात. तर त्याची आई बचत गटाचं काम करते. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आई-वडिलांनी पैशांची कमी न पडू देता मुलाला शिकवलं. शिक्षणासाठी पैशांची कधीही चिंता केली नाही. परिणाम आज सर्वांसमोर आहे.
जीवनच्या यशाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून ते आजी/माजी आमदारांनीही जीवनला यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या जीवनने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. दिलीपराव सोपल विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि अकरावी, बारावीसाठी सोलापूर गाठलं.
जीवनचं शिक्षण आणि अभ्यास
बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर पुण्यातून बीएस्सीची पदवी घेतली. या काळातच एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. बीएस्सीची परीक्षा पास झाल्यानंतर जीवनने FRO (Forest Range Officer) वर्ग दोनची परीक्षा दिली आणि यात त्याने यशही मिळवलं.
उत्तराखंडमध्ये जीवन सेवा बजावत होता. पण क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. यानंतर जीवनने सुट्टी टाकून दिल्लीत यूपीएससीची तयारी सुरु केली. आयएफएसचा निकाल आला त्यावेळी जीवन नेमकाच धारवाड येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाला होता. अखेर 6 फेब्रुवारी 2019 हा दिवस त्याच्या आयुष्यातील असा दिवस बनून आला, ज्याची तो वाट पाहत होता आणि ज्यासाठी त्याने परिश्रम घेतले होते.
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार आणि रँकिंग
यूपीएससीमार्फत एनडीए, सीएसई (Civil services examination), IFS अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. आयएफएसचा निकाल गुरुवारी जाहीर झालाय. यापैकी आयएफएस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 89 जणांपैकी महाराष्ट्रातले 12 जण आहेत.
शेख जमीर मुनीर (18)
अभिजित जीनचंद्र वायकोस (27)
श्रीकांत खांडेकर (33)
अनिल म्हस्के (49)
जीवन दगडे (56)
चंद्रशेखर परदेशी (59)
अनिकेत वनवे (66)
योगेश कुलाल (68)
विक्रम नाधे (71)
हर्षराज वाठोरे (77)
पीयूष गायकवाड (85)
धनंजय वायभासे (89)