वॉशिंग्टन: जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याच्या निवडीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्या नशिबात नेमकं काय आहे? याचा निकाल काही दिवसातच लागणार आहे. पण, हा निवडणुकीचा रणसंग्राम किती मोठा आहे? या निवडणुकीत कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय? हे ऐकून तुमचं डोकं गरगरायला लागेल. अमेरिकेच्या यंदाच्या निवडणुकीत तब्बल 14 अब्ज डॉलरपेक्षा जास्तीचा खर्च केला जाणारेय.
भारतीय रुपयांमध्ये या खर्चाचा विचार करता ही रक्कम 1 लाख 4 हजार 395 कोटी रुपये एवढी होते. 1 लाख 4 हजार 395 कोटी रुपयांत तर लहान देशांचा उद्धार होऊ शकतो. त्यामुळे 2020ची अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक इतिहासातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरतेय.
‘द सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’च्या नुसार निवडणुकीच्या शेवटच्या महिन्यात राजकीय निधीत अमाप वाढ झालीय.
यापूर्वी अमेरिकेच्या या निवडणुकीत 11 अब्ज डॉलरच्या म्हणजे जवळपास 81 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला.. पण, ताज्या आकडेवारीनुसार यावेळी निवडणुकीत रेकॉर्डब्रेक खर्च होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कोणत्या उमेदवाराला किती निधी मिळाला, यावरुन निकालाची भविष्यवाणी केली जाते. यावेळी मात्र राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प निधी गोळा करण्यात मागे पडताना दिसतोय.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत 59.6 कोटी डॉलर्स म्हणजे, 4 हजार 436 कोटी 486 लाखापर्यंतचा निधी प्रचारासाठी गोळा केला होता. त्यांच्या तुलनेनं डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनी एकूण 93.8 कोटी डॉलर्स म्हणजे, 6 हजार 984 कोटी 778 लाखहून अधिकचा निधी गोळा केला.
आजच्या तारखेला जो बिडेन अमेरिन राष्ट्रपती निवडणुकीत सर्वाधिक निधी गोळा करणारे उमेदवार ठरले आहेत. बिडेन यांनी आतापर्यंत 1 अब्ज डॉलरहून अधिकचा निधी गोळा केला आहे. कोरोनाचा मार झेलणारे अमेरिकन्स बिडेन यांना सर्वाधिक निधी देत असल्याचं समोर येत आहे. रिसर्चनुसार यावेळी महिलांनी निधी देण्याचा रेकॉर्ड तोडल्याचं दिसतंय.
पण, केवळ निधीतच बिडेन पुढे आहेत असं नाही, तर प्रचारातही आघाडी घेतायेत. ज्याप्रमाणे 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत पवारांची पडत्या पावसातील सभा गाजली होती. अगदी तशीच एक सभा बिडेन यांची अमेरिकेत गाजतेय. ज्यात कोसळत्या पावसात बिडेन भाषण करताना दिसतायेत.
जो बिडेन यांच्या पुढाकाराचे दावे, अनेक सर्व्हेंमध्ये केले जातायेत.. पण, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या बाबींना जास्त महत्व द्यायला तयार नाहीत. डोनाल्ड ट्र्म्प त्यांच्या प्रचारात अमेरिकेतील महत्वाचे मुद्दे प्रकर्षानं मांडतायेत. ट्रम्प यांच्या रॅलीत चीन, चाइनीज व्हायरस आणि जगभरातील अमेरिकेच्या शत्रुंचा उल्लेख करून देशभक्ती जागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता ट्रम्प राष्ट्राध्यक्षपद टिकवण्यात यशस्वी होतात की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती; सामान्य नागरिकांकडून पिस्तुल आणि बंदुकांच्या खरेदीचा सपाटा
तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर
जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र