वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Usa Presidential election) रिपब्लिक पक्षाचे उमेदवार तसेच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपला पराभव मान्य करत नव्हते. मी जिंकलोय, माझाच विजय झाला आहे, असा नारा ते देत होते. तसेच ट्रम्प निवडणुकीच्या निकालाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत होते. अखेर ट्रम्प यांनी त्यांचा पराभव जवळपास मान्य केला आहे, असे म्हणता येईल, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. (US Election 2020 : Donald Trump accept transition to Joe biden must accept)
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करुन सांगितले आहे की, त्यांनी जनरल सर्विसेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (GSA) प्रमुख एमिली मर्फी (Emily W. Murphy) यांना बायडन यांच्याशी सहकार्य करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन जो बायडन (Joe biden) यांची अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनण्याची प्रक्रिया सुरळीत होईल”. माध्यमांनी बायडन यांचा निवडणुकीतील विजय घोषित केल्यानंतर तब्बल 16 दिवसांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांचा विजय मान्य केला आहे.
ट्रम्प यांनी अजून एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या देशाचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन मी एमिली आणि तिच्या टीमला सांगितले आहे की, जे करण्याची आवश्यकता आहे ते करा. त्यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. दरम्यान मर्फी यांनी स्पष्ट केलं आहे की, ट्रम्प यांच्या आदेशानंतर मी बायडन यांना सत्तास्थापनेसाठीचं निमंत्रण दिलं नसून त्यासंबंधीची प्रक्रिया मी यापूर्वीच सुरु केली होती.
नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना 306 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिकेत सत्तास्थापनेसाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते.
ओबामांचे ट्रम्प यांना खडे बोल
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दिला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ओबामा म्हणाले होते की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु झाल्यानंतर लगेचच किंवा दोन-तीन दिवसांनतर पराभव स्वीकारला पाहिजे होता.” ट्रम्प सातत्याने दावा करत होते की, माझाच विजय होणार आहे, त्यावर ओबामा म्हणाले की, ”आपण संख्याबळावर लक्ष दिलं तर बायडन यांनी सहजपणे विजय मिळवला आहे, हे लक्षात येतं. आता निवडणुकीचे निकाल बदलण्याची कोणतीही शक्यता नाही. निवडणुकीचे निकाल बदलले जाणार नाहीत”,
8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी
अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये 8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी सुरु राहणार आहे. यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जातील त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील.
अधिकृतपणे निकालांची घोषणा
अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन येत्या जानेवारी महिन्यात 6 तारखेला आयोजित केले जाईल. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.
संबंधित बातम्या
US Election | निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांना जेरुसलेममध्ये नवी नोकरी? नगरपालिकेकडून ‘जॉब ऑफर’