मुंबई : महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वाद ओढवून घेतल्यानंतर, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी कोश्यारींना अवमानाची नोटीस पाठवली आहे. थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. कोश्यारी यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Uttarakhand HC notice to Maharashtras Governor Bhagat Singh Koshyari )
रुरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (रूलक) उत्तराखंड हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुविधांच्या लाभापोटीचं भाडे सहा महिन्यात जमा करण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने त्यानुसार कोश्यारींना भाडे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र हे भाडे जमा न केल्याने, मंगळवारी कोर्टाने कोश्यारींविरोधात अवमानाची नोटीस धाडली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी 47 लाख 57 हजार 758 रुपये थकवल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
उत्तराखंडमधील नेमकं हे प्रकरण काय आहे?
उत्तराखंड उच्च न्यायालयात रूरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (RLEC) याचिका दाखल केली. ही याचिका ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय निवासस्थान व इतर सुविधा वापरल्याची थकबाकी 6 महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार कोश्यारी यांनी त्यांचे थकीत भाडे जमा केले नाही, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात मंगळवारी नोटीस बजावली आहे.
राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर अवमान याचिका दाखल करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांना माहिती देणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन कोश्यारी यांना 60 दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. 10 ऑक्टोबरला त्यांनी दोन महिने पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयात याचिका दाखल केली, असे सांगण्यात येत आहे. कोश्यारी यांच्याकडे 47 लाखांहून अधिक घरे आणि इतर सुविधा वापरल्याची थकबाकी आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही माजी मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचं याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे.
राज्यपालांचा पत्र वाद
गेल्याच आठवड्यात भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वाद ओढवून घेतला होता. हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?” असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला होता. यावरुन भगत सिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी हल्लाबोल केला होता.
शरद पवारांचा हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.
(Uttarakhand HC notice to Maharashtras Governor Bhagat Singh Koshyari )
संबंधित बातम्या
उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र
कोश्यारींचे वर्तन पदाला न शोभणारे, राजू शेट्टींचे टीकास्त्र, केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप
बलात्कार थांबवण्यासाठी संस्कृत श्लोक शिकवा : भगतसिंह कोश्यारी