वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज रस्त्यावर, शिवसेना आमदाराचीही साथ

| Updated on: Sep 11, 2019 | 5:23 PM

जिल्ह्यातील हजारो वंजारी समाजाचे नागरिक मोर्चात (Vanjari Arakshan Morcha Nashik) सहभागी झाले होते. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनीही या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज रस्त्यावर, शिवसेना आमदाराचीही साथ
Follow us on

नाशिक : वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Vanjari Arakshan Morcha Nashik) काढण्यात आला. दोन टक्क्यांवरून 10 टक्यांपर्यंत आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील हजारो वंजारी समाजाचे नागरिक मोर्चात (Vanjari Arakshan Morcha Nashik) सहभागी झाले होते. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनीही या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

आधी मराठा मोर्चा, नंतर पुन्हा धनगर मोर्चा आणि आता वंजारी मोर्चामुळे सरकारसमोर नवीन संकट उभं राहणार आहे. आरक्षणावरून निघालेल्या या मोर्चांमध्ये युवकांची संख्या लक्षणीय आहे. वाढीव आरक्षण मिळावं यासाठी नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. वाढीव आरक्षणासोबतच गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं मोर्चेकऱ्यांनी सांगितलं.

मोर्चात हजारो वंजारी बांधव आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर आले होते. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 12 डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमदार नरेंद्र दराडे यांनी सांगितलं. यापूर्वीही बीडमध्ये वंजारी समाजाने भव्य मोर्चा काढला होता. राज्यभरात वाढीव आरक्षणासाठी मोर्चे सुरु झाले आहेत.

नेमकी मागणी काय आहे?

राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसीमधून काढून एनटीमध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी दहा टक्के आरक्षण अटीला होते. पण एनटीमध्ये अ,ब,क आणि ड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळायला लागल्या.

जिथे 100 जागा असतील, तिथे केवळ दोन जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागत आहे. त्यामुळेच आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, तसं न झाल्यास पुन्हा ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी करत वंजारी समाजाने राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे.