बीड : आरक्षणाच्या मागणीसाठी आधी मराठा समाजाने क्रांती मोर्चा काढून सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर धनगर आणि मुस्लीम समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारची कोंडी केली. आता मात्र वंजारी समाजाने (Vanjari Reservation) आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार केलाय. वंजारी समाज (Vanjari Reservation) बांधवांनी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर महामोर्चा काढला. सत्तेत आणि विरोधात मात्तब्बर लोकप्रतिनिधी असतानाही वंजारी समाजाने या नेत्यांशिवाय आंदोलन पुकारलंय.
राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसीमधून काढून एनटीमध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी दहा टक्के आरक्षण अटीला होते. पण एनटीमध्ये अ,ब,क आणि ड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळायला लागल्या. जिथे शंभर जागा असतील, तिथे केवळ दोन जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागत आहे. त्यामुळेच आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, तसं न झाल्यास पुन्हा ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी करत वंजारी समाजाने बीडमध्ये महामोर्चा काढला.
राज्यातला वंजारी समाजाचा हा पहिलाच मोर्चा आहे. यापूर्वी वंजारी समाजाने असे कधीच मोर्चे काढले नाहीत. मात्र सत्ता आणि विरोधात काही मूठभर लोक समाजाचं प्रतिनिधित्व करत असले तरी सर्वसामान्य माणसाला मात्र याचा काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप करत वंजारी समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. हजारोंच्या संख्येने बीडमध्ये हा महामोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच समाज बांधव मोर्चात एकवटून सहभागी झाला होता. आचारसंहिता लागण्याआधी सरकारने वंजारी समाजाच्या आरक्षणाबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा समाज बांधवांनी दिलाय. त्यामुळे सरकारच्या डोकेदुखीत मोठी वाढ होणार हे मात्र निश्चित आहे.
कुठलीही राजकीय किनार न घेता पहिल्यांदाच वंजारी समाजाने हा स्वतंत्र अराजकीय मोर्चा काढलाय. याआधी मुंडे भावंडांच्या नेतृत्वाखाली लाखोंचे मोर्चे पाहायला मिळाले. मात्र पहिल्यांदाच मुंडे भावंडांना समाज बांधवांनी बाजूला सारून हजारोंच्या संख्येत मोर्चा काढला. त्यामुळे आगामी काळात याचा सर्वात जास्त फटका पालकमंत्री पंकजा मुंडेंना आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांना बसणार असल्याचं जाणकार सांगतात.
राज्यातल्या मराठा समाज बांधवांनी मोर्चाची सुरुवात करून दिली. त्यानंतर धनगर असेल, मुस्लीम असेल या समुदायांचे महामोर्चे महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिले. मात्र पहिल्यांदाच वंजारी समाजाने आता एल्गार पुकारलाय. येणाऱ्या काळात वंजारी समाजाचा हा मोर्चा विधान भवनापर्यंत पोहोचतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.