बंगळुरू : पुलवामा हल्ल्याला काहीच दिवस उलटले असताना, शहीद जवान एच. गुरु यांच्या पत्नीला एका नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. शहीद जवान एच. गुरु यांची पत्नी कलावतीवर दिरासोबत लग्न करण्यासाठी दबाव होत असल्याचा आरोप आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. धक्कादायक म्हणजे शहिदांना मिळणाऱ्या पैशाच्या वादातून हा दबाव आणला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
पुलवामा इथे 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यामध्ये कर्नाटकमधील एच. गुरु यांचाही समावेश होता. मात्र आता वीरपत्नी कलावती यांचं लग्न शहीद जवान एच. गुरु यांच्या भावासोबत लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा दबाव शहीद जवानाच्या कुटुंबीयांकडून टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. सरकारकडून शहीद जवानाच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पैशांच्या लालसेपोटी कलावती यांच्यावर दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे.
या सर्वप्रकारामुळे शहीद जवान एच गुरु यांची पत्नी कलावती (25) सध्या खूप दबावाखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहीद जवान एच. गुरु यांना सरकार आणि सैन्याकडून मिळणारी मदत आणि पैसे याचा फायदा आपल्याला मिळावा, यासाठी शहीद जवानाच्या कुटुंबीयांकडून कलावतीवर जबरदस्ती केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. कलावती यांनी याबाबत मांड्या पोलीस स्टेशनमध्ये मदत मागितली आहे. मात्र “हा कौटुंबिक वाद आहे आणि ही एक संवेदनशील घटना आहे, जर इथे कोणत्या कायद्याचे उल्लंघन झाले, तर कायदा आपले काम करेल”, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या या घटनेत कोणतीही केस दाखल झालेली नाही आणि कोणतीही चौकशी केली नाही, असं मांड्या पोलिसांनी सांगितले.
शहिदांच्या कुटुंबीयांना देशभरातून मदतीचा हात देण्यात येत आहे. दिवंगत अभिनेता आणि नेता एमएच अंबरीश यांची पत्नी सुमनलतानेही शहीद कुटुंबाला अर्ध्या एकरची जमीन देण्याचं आश्वासन दिलं आहे.
कलावतीला तातडीने नोकरी देण्याचे आदेश
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी कलावती यांना सरकारी नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. कुमारस्वामींचा मुलगा निखीलने परिवहन मंत्री डीसी तमन्ना यांना लवकरात लवकर कलावती यांना सरकारी नोकरी द्यावी असे सांगितले.
Karnataka: Family members of CRPF Constable Guru H pay their tribute to him in Gudigere, Mandya. #PulwamaAttack pic.twitter.com/QlbAC3TThJ
— ANI (@ANI) February 16, 2019