Saroj Khan Dies मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. कार्डिअॅक अरेस्टमुळे आज पहाटे (3 जुलै) दोन वाजता सरोज खान यांनी अखेरचा श्वास घेतला. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. (Veteran Choreographer Saroj Khan Dies at 71)
श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांना 20 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची ‘कोविड’ चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. बॉलिवूडची नृत्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
‘हवा हवाई’मुळे ओळख
सरोज खान यांचा जन्म 1948 मध्ये मुंबईत झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’साठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आणि त्यांची कारकीर्द सुरु झाली. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘हवा हवाई’ गाण्यामुळे.
‘चांदनी’ सिनेमातील गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर माधुरी दीक्षित सोबत तेजाब, बेटा अशा सिनेमातील गाण्यांना केलेल्या कोरिओग्राफीला तुफान यश मिळालं. जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमासाठी, दोन हजारपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती.
हेही वाचा : Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!
माधुरी दीक्षित ही त्यांची सगळ्यात आवडती अभिनेत्री होती. तिचा डान्स त्यांना प्रचंड आवडायचा. त्यांनी सगळ्यात जास्त हिट गाणी माधुरीसोबतच दिली. माधुरी दीक्षितवर चित्रीत केलेलं ‘कलंक’ सिनेमातलं ‘तबाह हो गये’ हे त्यांनी कोरिओग्राफ केलेलं शेवटचं गाणं ठरलं.
‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’, तामिळ सिनेमा ‘श्रीनगरम’मधली सगळी गाणी, आणि ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क हाय’ या गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना तीन वेळा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला. गुरु, खलनायक, बेटा, सैलाब, हम दिल दे चुके सनम, देवदास या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाले होते. त्यांनी नाच बलिये, झलक दिखला जा अशा अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिले.
13 व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला
सरोज खान यांचं मूळ नाव निर्मला नागपाल. वयाच्या 13 व्या वर्षी सरोज खान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. 1965 मध्ये त्या वयाने 30 वर्ष मोठ्या जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकल्या.
सरोज खान नेहमीच आपली परखड मते, वक्तव्याबद्दल चर्चेत राहायच्या. नवोदित डान्सर्सला योग्य न्याय मिळत नाही, डावललं जातं, गटबाजी सुरु झाली आहे, यावर अलिकडच्या काळात त्यांनी वारंवार आवाज उठवला होता.
The last rites of #SarojKhan will be peformed at Malvani in Malad, Mumbai today. She died due to a cardiac arrest in the ICU of Guru Nanak Hospital where she was admitted on June 20 after she complained of breathing issues. https://t.co/eGcXwJDkw3
— ANI (@ANI) July 3, 2020