मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार आजही कायम पाहायला मिळाली. त्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, गावातील शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या 2 आणि 3 जुलैला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसापासून मुंबई, पुणे, नाशिक, कोकण या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. एकीकडे हे चित्र असलं, तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम पाहायला मिळत आहे. दरम्यान 2 ते 3 जुलैपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान राज्यात आज (29 जून) मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मुंबईत आतापर्यंत कुलाबा येथे 12.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुज येथे 8.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील कामवारी नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे मंडई, तिनबत्ती भाजी मार्केट, निजामपुरा, पदमानगर, जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर ठाण्यातील शहापूर मुरबाड रस्त्यावरील नडगाव येथील पूल पाण्याखाली गेला. शहापूर खोपोली रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु होते. या शिवाय सकाळच्या पावसामुळे रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील नडगाव, ठिळे, टेंम्बरे, दीवली या गावांचा संपर्क तुटला आहे.
तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. कोल्हापूरातील राजाराम, शिंगणापूर, रुई, सुर्वे, इचलकरंजी हे कमी उंचीचे पाच बंधारे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी 20.6 फूटावर गेली आहे. तर धरणक्षेत्रात 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जालन्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे जुई नदीला पूर आला आहे. तर वसई विरारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या 10 ते 15 मिनिटाच्या पावसाने गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता
दरम्यान एकीकडे अशी स्थिती असताना विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात जराही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला अद्याप दिलासा मिळालेला नाही. मात्र या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या 2 आणि 3 जुलैला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
संबंधित बातम्या :
राज्यातील 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम