मुंबई : पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. महाराष्ट्राबाहेर असलेल्या 10 ते 12 हजार विद्यार्थ्यांनाही घरी आणण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली. (Vijay Wadettiwar assures Students stuck in Pune will go home)
केंद्र सरकारने मजूर, विद्यार्थी यांची ने-आण करण्याला परवानगी दिली आहे. पुढच्या पाच दिवसात सर्वांची ने-आण करण्याची व्यवस्था सरकार करणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
महाराष्ट्राबाहेर जवळपास 10 ते 12 हजार विद्यार्थी आहेत. तर पुण्यात शिकणारे सहा ते सात लाख विद्यार्थी आहेत त्यांची गावाकडे जाण्याची व्यवस्था केली जाईल. कोणीही चिंता करण्याचं कारण नाही, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी धीर दिला.
लॉकडाऊनमुळे राज्यात आणि राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
हेही वाचा : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांसाठी नियमावली जारी
ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे आणि उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक असेल. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडेही अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झीट पास असणे, त्यावर सर्व प्रवाशांची नावे आणि इतर माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक आहे.
लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 70 बसेस काल धुळ्याहून रवाना झाल्या होत्या. तर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे राजधानीतच अडकले आहेत. जवळपास साडेआठशेहून अधिक विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात परतण्यासाठी धडपड सुरु आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांसाठी नियमावली जारीhttps://t.co/Hy8kVIvhNb #MaharashtraFightsCorona #Maharashtra #maharashtralockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020