मुंबई : छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपतींच्या घराण्याबाबत सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मेटेंनी केला आहे. (Vinayak Mete demands to revoke charter of Lawyer Gunaratna Sadavarte)
“अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे” अशी मागणी विनायक मेटेंनी केली.
“गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. मी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी करतो” असा संताप विनायक मेटे यांनी व्यक्त केला.
कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?
गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने वकील आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल सदावर्ते यांनी आपल्याला अनेक धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे.
प्रशिक्षणानंतरही 154 पोलिसांची फौजदारपदी न झालेली नियुक्ती, ज्येष्ठ नागरिक कायदा, ‘मॅट’च्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करणे, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनके केस त्यांनी हाताळलेल्या आहेत.
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 8 October 2020https://t.co/lpWsv4G0Qa
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
संबंधित बातम्या :
संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते
आतापर्यंत 10 मराठा मुख्यमंत्री, अनेकांचे साखर कारखाने, आरक्षण चुकीचं : गुणरत्न सदावर्ते
(Vinayak Mete demands to revoke charter of Lawyer Gunaratna Sadavarte)