नागपूर: मोबाईल दिला नाही म्हणून नुकतंच पुण्यात एका मुलानं आत्महत्या केली. महिभरापूर्वी नागपुरातही अशीच घटना घडली होती. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततोय. शिवाय या सायबर गुलामीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतोय. हा धोका वेळोवेळी तज्ज्ञांनी बोलून दाखवला आहे. आज राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुलं सायबर गुलामीत जात आहेत, याविरोधात लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी नागपुरातील विद्यार्थ्यांना केलं.
मोबाईलवर तासंतास बोलणे, गेम खेळणे,कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा अतिवापर आणि टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं, अशी कहाणी जवळपास प्रत्येक घरातच पहायला मिळते. पण या सायबर गुलामीच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्यचं धोक्यात आहे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि यावर फेसबूक, किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ही बाब आता राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळेच त्यांनी नागपुरातील विद्यार्थ्यांना सायबर गुलामीविरोधात लढा उभारण्याचं आवाहन केलं.
सायबर गुलामीविरुद्धच्या या लढ्यात आठवड्याला एक दिवस विद्यार्थ्यांनी तीन तास मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप वापरु नये, हा सल्ला विनोद तावडे यांनी दिला. सोशल मीडिया तज्ज्ञ आणि पालकही आता सायबर मीडियाचा विद्यार्थ्यांनी फक्त ज्ञानासाठी वापर करावा, त्याचा अतिवापर आणि गैरवापर टाळावा. असा सल्ला दिला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सायबर गुलामीच्या विरोधातील लढ्याला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आठवड्यातून एकदा तीन तास इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरणार नाही, असा संकल्प नागपुरातील विद्यार्थ्यांनी केला.
अति तिथं माती… असं म्हटलं जातं. आपल्या घराघरात मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप सहज उपलब्ध आहे, पण त्याचा अतिवार आणि गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी सायबर गुलामीविरोधात लढा उभारण्याचं आवाहन राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना करावं लागलं. यावरुनच या समस्येचं गांभीर्य लक्षात येतं. नागपुरात सायबर गुलामीविरोधातील हा लढा यशस्वी झाला तर सरकार राज्यभर हा उपक्रम राबवणार आहे.