जालनाः महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कोरोनासंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील विरेगाव येथील एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेताना 20 लोकांचीच परवानगी देण्यात आली आहे. मात्र खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच कार्यक्रमात 200 लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीच अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन केल्यानं जनतेनं कुणाचा आदर्श घ्यावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जालन्यातील विरेगाव येथील एका कार्यक्रमात राजेश टोपे यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. विरेगाव येथे अॅनिमियामुक्त गोव मोहिमेच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शेकडो लोकांची गर्दी जमवल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी खरं तर 20 जणांची परवानगी देण्यात आली होती. मात्र कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. राजेश टोपे यांनी यापूर्वी औरंगाबादमधील कार्यक्रमातदेखील कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केलं होतं. आता जालन्यातही तोच प्रकार पहायला मिळत आहे. खुद्द आरोग्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच नियमांना फाटा लावलो जातोय. आता यातून कोरोनाचा प्रसार झाल्यास, त्याला जबाबदार कोण राहील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विरेगाव येथील कार्यक्रमापूर्वी जालन्यातील महिला व बाल रुग्णालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. टोपे यांच्या उपस्थितीत दहा ते बारा किशोरवयीन मुलांना लस देण्यात आली. या वयोगटातील मुलेच जास्त फिरणारी असतात, त्यामुळे त्यांना लस देणे अत्यंत आवश्यक होते, असे टोपे यांनी सांगितले. तसेच त्यापेक्षाही लहान म्हणजे 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इतर बातम्या-