तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. मात्र, मंदिर परिसरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पहायला मिळालं. त्याचबरोबर भाविक, पुजारी आणि व्यापारी मास्कविना फिरताना पाहायला मिळाले. महत्वाची बाब म्हणजे मंदिर संस्थान, पोलीस आणि नगर परिषदेकडूनही मास्क न वापरणाऱ्यांना रोखण्याची तसदी घेतली गेली नाही. (Violation of rules in Tulja Bhavani temple area bye devotees)
तुळजाभवानी मंदिर परिसरातील हळद-कुंकु, फुले आदी व्यापाऱ्यांनी मास्क न घालता दुकानं बिनदिक्कत सुरु ठेवली होती. इतकच नाही तर सरकारकडून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनाही दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आलं होतं. दर्शन रांगेतही अनेक भाविक विना मास्क उभे होते. तर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर यंत्रणाही कार्यान्वित नव्हती.
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून मोठ्या संख्येनं भाविक येतात. मात्र भाविकांकडून मंदिर परिसरात कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.
साडे तीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीची दिवाळी पाडव्यानिमित्त शिवकालीन दागिन्यांत पूजा करण्यात आली. तुळजाभवानीला वर्षातून सहा वेळेस शिवकालीन दागिने घातले जातात. आजच्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. देवीला घातल्या जाणाऱ्या शिवकालीन दागिन्यांमध्ये हिरे, माणिक, मोती आणि पाचूनी बनवलेला जरीटोप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीच्या चरणी अर्पण केलेली 108 मोत्यांची माळ आज घातली जाते.
दिवाळी पाडव्यानिमित्त तुळजाभवानीची शिवकालीन अलंकार पूजा, दर्शनासाठी राज्यभरातून भाविक तुळजापुरात
Violation of rules in Tulja Bhavani temple area bye devotees