मुंबई : रेव्लेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास असतो. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी आपण रेल्वेला पसंती देतो. पण आजकाल रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं तर रिझर्व्हेशन मिळणार की नाही, याची चिंता असते. कारण तुम्ही कुठल्याही मोसमात रेल्वे तिकीट काढायले गेले तरी बहुतेक वेळी रिझर्व्हेशन मिळत नाही आणि मिळालं तरी ते वेटिंग किंवा आरएसी यादीत मिळतं. जेव्हा आपण वेटिंग किंवा आरएसी तिकिटावर प्रवास करतो, तेव्हा काही लोक हे टीटीसोबत सेटिंग लावून सीट मिळवतात. यामध्ये ज्याला नियमाप्रमाणे ती सीट मिळायला हवी त्याला ती मिळत नाही. हे आपल्या सर्वांसोबत घडतं, मात्र आपण काहीच करु शकत नाही, कारण सीट कुणाला द्यायची हे टीटीवर अवलंबून असतं. टीटीच्या याच हेराफेरीवर आळा बसवण्यासाठी रेल्वेने एक उपाय शोधला आहे. यामुळे वेटिंगची तिकीट त्यांचीच कन्फर्म होईल ज्यांचा त्यावर हक्क आहे, टीटी स्वत:हून कुणालाही सीट ईश्यू करु शकणार नाही. यासाठी टीटींना एक हॅण्डहेल्ड मशीन देण्यात येईल, ज्यामध्ये प्रवाशांच्या क्रमवारीनुसार त्यांना आपोआप सीट ईश्यू होत जाईल.
कशी असेल ही मशीन?
टीटीजवळ नोटपॅडच्या आकाराची एक मशीन असेल, जी इंटरनेट आणि रेल्वेच्या मेन सर्व्हरशी जोडलेली असेल. या मशीनवर संबंधीत गाडीतील प्रवाशांनी बुक केलेल्या सीटचा चार्ट दिसेल. जर कुठला यात्री ट्रेनमध्ये उपस्थित नसेल, तर त्याच्या प्रवासाची माहिती टीटी यात भरेल. जी सरळ मेन सर्व्हरला जाईल. यानंतर ज्याही प्रवाशाचा क्रमांक आरएसी किंवा वेटिंग क्रमवारीत असेल त्याला ती सीट ईश्यू होईल. म्हणजेच वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना ती सीट सेल्फ ट्रान्सफर होऊन जाईल. यात टीटी कुठल्याही प्रकारचा घोळ करु शकणार नाही.
या मशीनचा पहिल्यांदा वापर अमृतसर-नवी दिल्ली शताब्दी एक्स्प्रेसमध्ये झाला. फिरोजपूर-नवी दिल्ली शताब्दी एक्स्प्रेसमध्येही ही सुविधा लागू करण्यात येणार आहे. जर या दोन्ही गाड्यामध्ये हा प्रकल्प यशस्वी ठरला तर भारतभर ही सुविधा लागू केली जाईल. यामुळे टीटीच्या हेराफेरीवर आळा बसेल आणि आपल्या हक्काची सीट आपल्याला मिळू शकेल.