मुंबई : जगातील फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार. भले भले सेलेब्रेटी हा पुरस्कार मिळावा म्हणून जीवाचे रान करतात. जीव ओतून काम करतात तरीही त्यांच्या नशिबी हा पुरस्कार नसतो. ऑस्कर पुरस्कारांचे फक्त नामांकन मिळणे ही सुद्धा एक मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. तितके जरी मिळाले तरी लोक खूष होतात. नामांकन मिळाले आणि पुरस्कार मिळाला नाही तरीही हे कलाकार खुश असतात. परंतु, याच फिल्म इंडस्ट्रीत एका असाही महान कलाकार होता. ज्याने एक दोन नव्हे तर तब्बल 22 ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले. शिवाय त्या कलाकाराचे 59 पुरस्कारांसाठी नामांकन झाले होते. 1932 साली त्या महान कलाकाराला सर्वोत्कृष्ट लघू विषयातील (कार्टून) पुरस्कारासोबत तब्बल चार ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. हा कलाकार म्हणजेच ‘मिकी माऊस’ या जगभरात लोकप्रिय झालेल्या कार्टूनचा निर्माता, लेखक वॉल्ट डिस्ने… कधी काळी व्हॅक्युम क्लीनर विकणारा ते जगातील सर्वात जास्त ऑस्कर मिळविणारा कलाकार हा त्याचा प्रवास काही सहजासहजी घडलेला नाही. याच ऑस्कर विजेत्या वॉल्ट डिस्ने याची ही चित्त थरारक कहाणी…
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील तीन दशलक्ष या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शिकागो शहरात 5 डिसेंबर 1901 रोजी वॉल्ट डिस्ने यांचा जन्म झाला. बंदर, व्यावसायिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र यासाठी हे शहर प्रसिध्द. याच शहरात एलियास डिस्ने आपली पत्नी फ्लॉरा काल हिच्यासोबत रहात होता. या दाम्पत्याला एकूण पाच मुले झाली. एलियास डिस्ने हे शेतीकाम आणि जोडीला सुतार काम करून कुटुंबाचे पोट भरत होता. वॉल्ट डिस्ने चार वर्षाचे असताना वडिलांनी मर्सिलीन येथे जाण्याचा निर्णय घेतला. मर्सिलीन जवळील मिसौरी येथील एका शेतात त्यांनी आपले बस्तान बांधले. परंतु, येथेही त्यांना फार काळ काढता आला नाही. त्यामुळे शेत विकून ते कानस शहरामध्ये स्थायिक झाले. उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला. लहान मुलांची त्यांना मदत होत होती. परंतु, सात वर्षातच त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि पुन्हा एकदा शिकागोची वाट धरली.
व्यवसायात कटू अनुभव आल्यानंतर एलियास डिस्ने यांनी जेली, फ्रूट ज्यूस बनविणाऱ्या कंपनीत नोकरी धरली. वॉल्ट आता 16 वर्षाचा झाला होता. त्याचे शिक्षणात लक्ष नव्हते त्यामुळे त्याने शाळेला राम राम केला. शिक्षणात लक्ष नसले तरी चित्रकला हा त्याचा आवडता विषय होता. अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली होती. रेड क्रॉसमध्ये सामील होण्याचे आवाहन अमेरिकन सरकारने केले होते. मात्र, रेड क्रॉसमध्ये सामील होण्यासाठी वय 17 वर्ष पूर्ण असावे अशी अट होती. पण, वॉल्ट डिस्ने याने बनावट जन्मदाखल्याच्या आधारे रेडक्रॉसमध्ये प्रवेश मिळविला. युद्धबंदी झाली आणि 1919 मध्ये त्यांनी नोकरी सोडली.
रेडक्रॉस सोडल्यानंतर वॉल्ट डिस्ने याने कार्टुनिस्ट होण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील कानस शहरात त्यांना मासिक, वृत्तपत्र, चित्रपट याच्या जाहिरातीचे काम मिळाले. याच काळात ऍनिमेशन हे नवीन तंत्र उदयास येत होते. त्याचवेळी त्यांनी एडविन जी लुत्ज यांचे अॅनिमेटेड कार्टून्स हे पुस्तक वाचले. अॅनिमेशन या क्षेत्रातच आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. अॅनिमेशनचा अभ्यास सुरु केला. आपल्या विचारांच्या बळावर त्यांनी ‘लाफ-ओ- ग्राम’ नावाचा स्टुडिओ सुरु केला. या पहिल्या प्रयत्नात त्यांना खोप मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तो स्टुडिओ बंद करून मोठ्या भावासोबत घरोघरी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकायला सुरवात केली. पण, त्या व्यवसायात त्यांच्यामधील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा डिस्नी ब्रदर्स स्टुडिओची स्थापना केली.
डिस्नी ब्रदर्स स्टुडिओमध्ये त्यांचा मोठा भाऊही त्यांच्यासोबत होता. या स्टुडिओत ते छोट्या फिल्म आणि निरनिराळे अॅनिमेटेड कार्टून तयार करत. 1927 मध्ये वॉल्ट डिस्ने याला एक मोठा धक्का बसला. वॉल्ट याने एक कार्टून तयार केले. ‘द लकी रॅबिट’ ( Oswald the Lucky Rabbit) असे नाव त्याने त्या कार्टूनला दिले. हे कार्टून खूप गाजले. पण, एका मित्राने त्यांची फसवणूक करून त्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यामुळे कार्टूनमधून मिळणारे सर्व उत्पन्न मित्राला मिळत होते. परिणामी कामगारांचे पगार थकले, स्टुडीओ बंद करण्याची वेळ आली. निराशेच्या गर्तेत सापडलेले वॉल्ट एके संध्याकाळी लॉस एंजेलिसहून कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करत होते. अचानक त्यांच्या मनात आणखी एका कार्टूनने जन्म घेतला. हाच तो जगप्रसिद्ध झालेला मस्तीखोर मिकी माऊस.
मिकी माऊसची कल्पना सुचल्यानंतर वॉल्ट यांना हुरूप आला. आपल्या मिकीला जन्म देण्यासाठी त्यांनी चार वर्षे खर्च करून आराखडा तयार केला आणि मिकी माऊसला मूर्त रूप दिले. ‘स्टीमबोट विली’ ही मिकी माऊसची पहिली शॉर्ट फिल्म. मिकी लोकांना खूपच भावला. रातोरात मिकी स्टार झाला. पण, लोकांनी मिकी माऊस याचा पहिला आवाज ऐकला तो ‘द कार्निव्हल कीड’ या चित्रपटामधून. ‘द कार्निव्हल कीड’ मध्ये मिकी माऊस याने ‘हॉट डॉग, हॉट डॉग’ म्हणत लोकांच्या पसंतीस उतरला. निराशेच्या वातावरणात जन्म घेतलेल्या मिकी माऊस आणि त्याच सहकारी कार्टून पात्रांनी डिस्ने ब्रदर्सला खूप मोठी भरारी दिली. अॅनिमेशन फिल्मच्या मालिकेतून त्यांनी बराच पैसा कमावला. त्यानंतर त्यांनी पूर्ण लांबीची रंगीत फिल्म बनवायला सुरुवात केली. पुढे याच मिकी माऊसने वॉल्ट डिस्ने याला ऑस्कर पुरस्काराचा मानकरी बनवले.
मिकी माऊसच्या फिल्म बॉक्स ऑफिसवर गाजत होत्या. पुढे, टीव्हीच्या युगातही वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सुरूच राहिली. सलग 20 वर्षे मिकी माऊसच्या कार्टून फिल्मने टीव्हीवर राज्य केले. यशाच्या शिखरावर पोहोचलेला वॉल्ट डिस्ने एका रविवारी आपल्या दोन मुलीसह फिरायला निघाला. डायना आणि शेरॉन या दोन मुलींसह तो ग्रिफिथ पार्क येथे पोहोचला. पण, त्याच्या मुलींना ते पार्क आवडले नाही. त्या कंटाळल्या. पार्कमधील इतर मुलामुलींचीही तीच अवस्था होती. लहान मुलांसोबत पालकांनाही मजा करता येईल असे ठिकाण त्यावेळी नव्हतेच. मिकी माऊसच्या फिल्मसाठी वॉल्ट डिस्ने याने अनेक ठिकाणे चितारली होती. नव्या कल्पक योजना आणल्या होत्या. यातूनच त्यांचे विचारचक्र सुरु झाले. वॉल्ट डिस्ने यांनी जे पैसे कमावले त्यामधूनच ड्रीम प्रोजेक्ट तयार झाला. आपल्या नावानेच त्यांनी डिस्नेलँड नावाचे थ्रिलर असणारे मजेदार जग तयार करण्यास सुरुवात केली. प्रदीर्घ मेहनत आणि प्रयत्न यामधूनच अखेर 17 जुलै 1955 रोजी कॅलिफोर्नियामध्ये डिस्नेलँड उभे राहिले. आतापर्यंत सुमारे 51.5 कोटीहून अधिक पर्यटकांनी डिस्नेलँड पार्कला भेट दिली आहे. यामध्ये अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख, राजे आणि अन्य उद्योगपती यांचा समावेश आहे.
मिकी माऊसच्या जन्मानंतरच वॉल्ट डिस्ने यांना खऱ्या अर्थाने यशाची पायरी चढता आली असे म्हणावे लागेल. कारण याच मिकी माऊस आणि त्यावर आधारित फिल्म्ससाठी वॉल्ट डिस्ने यांची दखल ऑस्करसारख्या नामांकित पुरस्काराने घेतली. वॉल्ट डिस्ने यांना तब्बल 22 ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, 59 पुरस्कारांसाठी त्यांना नामांकन मिळले होते. 1932 मध्ये त्यांना 4 ऑस्कर पुरस्कार मिळाले. तर, 1939 मध्ये ‘स्नो व्हाईट आणि सेव्हन वाफ्स’ यासाठी पुरस्कार मिळाला. जगातल्या या अद्भुत आणि अद्वितीय अशा या महान कलाकाराचे 15 डिसेंबर 1966 रोजी कॅन्सरच्या आजाराने दुर्दैवी निधन झाले.