वर्धा : वर्ध्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त केलेल्या धान्य वाटपाच्या कार्यक्रमात गर्दी झाल्याने प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारला आहे. (Wardha BJP MLA Dadarao Keche booked)
आर्वीमध्ये भाजप आमदार दादाराव केचे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप कार्यक्रमात गर्दी झाल्याने आमदारांवर चहुबाजूने टीका झाली होती. केचे यांनी संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली केल्याची बातमी ‘टीव्ही9’ ने दाखवताच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले.
या प्रकरणावर सामाजिक संघटनांनीही टीका केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायदाच धाब्यावर बसवल्याने कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत आमदार दादाराव केचे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दादाराव केचे यांनी नेमकं काय केलं?
आमदार दादाराव केचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित केलं. यासाठी रिक्षा फिरवून धान्य वाटपाचीही घोषणा करण्यात आली होती. धान्य वाटपच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भंग करण्यात आला. केचे यांच्या घरासमोर जमलेली गर्दी एखाद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमवलेल्या लोकांप्रमाणे भासत होती.
Maharashtra: A large crowd of people gathered outside the residence of Arvi’s BJP MLA Dadarao Keche in Wardha y’day on his birthday,violating #CoronavirusLockdown,after they were allegedly told that ration is being distributed at his residence. FIR has been registered against him pic.twitter.com/WYsH6Jx6Nj
— ANI (@ANI) April 6, 2020
संचारबंदीत परवानगी दिली जात नाहीच, परंतु आमदार केचे यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचनाही प्रशासनाला दिली नव्हती. त्यामुळे नागरिकांची गर्दी जमल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी आदेश काढून पोलिसांना कारवाईचे पत्र दिले होते.
वाचा सविस्तर : भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन, गर्दी जमवून जोरदार गोंधळ
सर्व परिस्थितीची आपणास पुरेपूर जाणीव आहेच. यामुळे नियमानुसार संदर्भीय आदेश व कायद्यानुसार त्वरित कार्यवाही करावी असे आदेश पत्रातून देण्यात आले. त्यानुसार आर्वी पोलिसांनी कलम 188 आणि 269 नुसार साथ प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र्र कोविड 19 उपाय योजनेनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
(Wardha BJP MLA Dadarao Keche booked)