वर्धा : लॉकडाऊन घोषित होताच अनेक ठिकठिकाणी मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळाली. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा तसेच बालाघाट येथे पायदळ निघालेल्या या मजुरांना रोखून धरत जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली होती. निवारागृह हेच आत्ताचे घर ठरलेल्या या मजुरांना आता जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने रस्त्यावरील कामावर रोजगार दिला जात आहे (Work for migrant labours in Wardha). मजुरांच्या मजुरीची गाडी पूर्ववत रुळावर येण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आता हे काम घराची ओढ लागलेल्या मजुरांना येथे किती काळ रोखू शकेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
लॉकडाऊन घोषित होताच विविध ठिकाणचे मजूर घरी परत जायला निघाले होते. काही आस्थापनांनी तर या मजुरांना बाहेर काढले होते. पण आता लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि रस्ते कामात शिथिलता आणत या मजुरांच्या हाताला काम दिले आहे. जिल्ह्यात 61 निवारा गृहात 8 हजार 225 मजूर आश्रयाला आहेत. त्यापैकी 6800 मजुरांना ग्रामीण भागात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावर रोजगार देण्यात येत आहे. यात समृद्धी महामार्ग, नरेगा, तुळजापूर महामार्ग अशा विविध रस्त्यांच्या कामावर या मजुरांना काम देण्यात येत आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्वतः ही माहिती दिली.
वर्ध्याच्या सेलू तालुक्यात सर्वाधिक 4863, हिंगणघाट तालुक्यात 1172, समुद्रपूर तालुक्यात 726, वर्धा तालुक्यात 727, देवळी तालुक्यात 274, आर्वी तालुक्यात 292, आष्टी तालुक्यात 127, कारंजा तालुक्यात 44, असे एकूण 8225 मजूर निवारागृहात आश्रयाला आहेत. या मजुरांना नास्ता, चहा, भोजन, निवारा, औषधोपचार अशा सुविधा देण्यात येत आहे. या सुविधा त्यांच्यासाठी संजीवनी ठरल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरु आहे. याशिवाय काही कृषी उद्योगांना सवलत देखील दिली जात आहे. जिल्ह्यात असणारे समृद्धी व तुळजापूर मार्गाचे मजूर काही आस्थापनात निवाऱ्यासाठी होते. या मजुरांना पूर्ववत कामावर घेत त्यांचे काम सुरु केले जाणार आहे. यातून तब्बल 6800 मजुरांना काम मिळाले आहे.
Work for migrant labours in Wardha