वर्धा- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीला आठवडा शिल्लक आहे. देशाला सर्वोदयाचा विचार देणाऱ्या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग उठलेत. अध्यक्ष पदाची मुदत वाढवून ती डिसेंबर 2020 पर्यंत करण्यात आली असताना अचानक सदस्यांच्या ऑनलाइन बैठकीत अध्यक्ष महादेव विद्रोही यांना हटविण्यात आले. मात्र, महादेव विद्रोही यांनी ही कारवाई असंवैधानिक असल्याचा आरोप केला आहे. कुठलाही अधिकार नसताना आपल्या विरोधकांनी कुरघोडी केल्याचा आरोप विद्रोही यांनी केला. अध्यक्ष महादेव विद्रोही आणि सदस्य अविनाश काकडे यांनी सेवाग्राम पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. (Mahadev Vidrohi removed from Chairman post of Sarv Seva Sangh)
सर्व सेवा संघ या महात्मा गांधी यांच्या अनुयायांच्या मातृसंस्थेकडून संपूर्ण देशात गांधीवादाची चळवळ चालते. सर्वोदयाचे कार्यक्रम पोहोचविले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून सर्व सेवा संघालाच ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. भूदान घोटाळा आणि मालमत्ता हडपण्याच्या प्रकारावरून अनेकदा गांधीवाद्यांमध्ये भडका उडाला आहे.
महादेव विद्रोही यांचा कार्यकाळ 31 मार्च 2020 रोजी समाप्त झाला आहे. कोरोना संकटामुळे कार्यकाळ 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. सर्व सेवा संघाच्या घटनेतील तरतुदींनुसार निवडणूक बोलावणे आणि बैठक बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. पण अचानक ऑनलाइन बैठक बोलावण्यात आली. त्यामुळे या बैठकीवरच महादेव विद्रोही यांनी आक्षेप घेतला आहे.
महादेव विद्रोही सेवाग्राम येथे पोहचल्यावर मात्र कार्यालयाची जबाबदारी घेतलेल्या अविनाश काकडे यांनी कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे विद्रोही यांना कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्व सेवा संघाच्या कार्यालयात विद्रोही येतील आणि गोंधळ घालतील, अशा प्रकारची तक्रार काकडे यांच्यातर्फे सेवाग्राम पोलिसात करण्यात आली आहे. महादेव विद्रोही यांच्यातर्फे अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार पोलीसात देण्यात आली आहे.
कुठलाही अधिकार नसताना काही लोकांना पदावरून काढण्याचा प्रकार महादेव विद्रोही यांच्याकडून गेल्या चार महिन्यापासून सतत होत आहे. महादेव विद्रोही हे मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत त्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सेवा संघातील देशातील सदस्य त्यांच्या विरुद्ध सदस्य असल्याचे अविनाश काकडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या सेवाग्राम येथील सर्व सेवा संघाच्या कार्यालयात चाललेला वाद महात्मा गांधी यांच्या विचारांना तर तडा देणार नाही ना ! असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या-
रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे