अमेरिकेत रहाणारी अशी एक व्यक्ती होती की ज्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात 172 वेळा विषारी साप चावले होते. 20 वेळा त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्याचा मृत्यू झाला असता. पण, आयुष्याची 100 वर्षे त्याने पूर्ण केली. अमेरिकेत तो स्नॅक मॅन नावाने ओळखला जात होता. त्याला त्याची प्रतिकारशक्ती वाढवायची होती. म्हणून तो विषारी अशा सापांकडून दंश करून घेत असे. लहानपणापासूनच त्याल सापांबद्दल विशेष आकर्षण होते. त्यामुळे त्याने एक सर्प संग्रहालय उघडले होते. बिल हास्ट असे या व्यक्तीचे नाव होते.
बिल हास्ट याचे खरे नाव विल्यम एडवर्ड हास्ट होते. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1910 रोजी पॅटरसन, न्यू जर्सी येथे झाला. वयाच्या 7 व्या वर्षी त्याने पहिला साप पकडला. शाळा सोडून तो साप पकडण्याचे काम करू लागला. नंतर तो पॅन अमेरिकन एअरवेजसाठी मेकॅनिक आणि फ्लाइट इंजिनियर बनला. त्याने जगभरात उड्डाण केले. अनेकदा आपल्यासोबत तो हत्यारांसह परदेशी सापही आणत असे. या काळात त्याला कधी साप चावायचा तर साप चावल्याने कधी त्याची प्रकृती बिघडायची. त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी हास्टने स्वतःला कोब्रा विषाचे लहान प्रमाणात इंजेक्शन घेण्यास सुरुवात केली. कालांतराने त्याने त्याचे प्रमाण हळूहळू वाढवले. याचा फायदा असा झाला की त्याच्या शरीरामध्ये विषविरोधी प्रतिकारशक्ती तयार होऊन साप चावल्याचा परिणाम त्याच्यावर होत नसे.
1946 मध्ये हास्ट याने विषाच्या औषधी गुणधर्मांवर काम सुरू केले. दोन वर्षांनंतर त्याने मियामी सर्पेन्टारियम उघडले. लोकांना समोर बसवून तो विषारी सापांचे विष कसे काढायचे याचे प्रशिक्षण देत असे. नंतर त्याने हे प्रशिक्षण देणे बंद केले तरी वैद्यकीय वापरासाठी सापांचे विष काढणे मात्र सुरूच ठेवले होते. साप चावल्यावर औषध बनवण्यासाठी कच्च्या विषाची निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. 1990 च्या दशकापर्यंत ते दरवर्षी औषधी प्रयोगशाळांना विषाचे 36,000 नमुने पुरवत होते. बिल हास्ट याच्याकडे जगभरातील 10,000 हून अधिक साप होते. ज्यात सागरी, आफ्रिकन, कॉटनमाउथ, रॅटलस्नेक, कोब्रा, क्रेट्स, हिरवे मांबा, वाघ, साप, वाइपर आणि इतर अनेक विषारी प्रजातींचा समावेश होता.
वयाच्या 92 व्या वर्षी मात्र त्याने सापांना पकडून विष काढणे बंद केले. कारण, मलेशियन पिट व्हायपरने चावा घेतल्यामुळे त्याचे उजव्या हाताचे बोट कापले गेले. त्या वयातही हास्ट याने 32 सरडे आणि सापांच्या विषाचे मिश्रण त्याच्या शरीरात टोचून घेतले होते. असे असले तरी त्याने आपल्या शरीरातील विषविरोधी प्रतिकारशक्तीमुळे 20 हून अधिक लोकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली होती. त्याच्या या सापांच्या आवडीमुळेच त्याला अमेरिकेत ‘स्नेक मॅन’ म्हणून ओळखले जात असे. 1954 मध्ये त्याला जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या निळ्या क्रेटने चावा घेतला तेव्हा तो मृत्यूपासून थोडक्यात बचावला. या सापाच्या चाव्यानंतर कोणीही जिवंत राहत नाही. मात्र घडले उलटेच हास्ट याचा चावा घेतल्यानंतर 10 दिवसांनी सापचाच मृत्यू झाला.