नांदेड : अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे, असा विश्वास देत वेळप्रसंगी कर्ज काढायला लागले तरी काढू पण आम्ही शेतकऱ्यांना मदत करु, असा शब्द मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. (We will take out loan but we will help the farmers Says Minister Vijay Wadettiwar)
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालंय. कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करु असं आश्वासन दिलं.
शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्षे असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली. त्याखालोखाल आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाचे सर्व मंत्री आज संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री वडेट्टीवारांसमोर ठेवला. शेतीसोबतच नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील रस्ते व लहान पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने त्याच्या दुरुस्तीचेही नियोजन आवश्यक असून त्याबाबत स्वतंत्र आर्थिक मदत केली जावी, असे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले.
राज्य शासनाने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची मागणी आमदार मोहन हंबर्डे यांनी केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त फटका सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून ज्वारी व इतर पिकेही हातची गेले असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
(We will take out loan but we will help the farmers Says Minister Vijay Wadettiwar)
संबंधित बातम्या
पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची चार तोळ्यांची चेन चोरीला
ऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार