कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्खी कोल्हापूर नगरी शाहू जन्मस्थळावर उपस्थित राहिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी शाहू महाराज यांना अभिवादन केले.
यंदाच्या जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे शाहू महाराजांचे मूळ छायाचित्र कोल्हापूरकरांना पाहायला मिळाले आहे. शाहू जन्मस्थळावर अभिवादन केल्यानंतर दसरा चौक या ठिकाणी असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध संदेश देणारे चित्ररथांची कोल्हापूरच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग घेऊन आपल्या कला सादर केल्या. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली.. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार संभाजीराजेंनी मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “खासदार छत्रपती संभाजी महाराजांशी विविध विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असतं. गरीब विद्यार्थ्यांची मेडीकलची आर्धी फीही सरकार भरतं. शक्य तिथे आपण विद्यार्थ्यांना मदत करतो”.
उस्मानाबाद येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे यांनी सरकारनं सर्व विद्यार्थ्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करावं अशी मागणी केली होती.
त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजेंच्या मोफत शिक्षणाच्या मागणीचा विचार करणार असल्याचं म्हटलं. सध्या 12 वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
“महाराष्ट्रात सध्या 12 वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे. अगदी बसचा पासदेखील दिला जातो. प्रामुख्याने जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वकाही मोफत असतं. फी नसतेच, गणवेश, पुस्तकं, वह्या दिल्या जातात. ज्यांना बऱ्या शाळांमध्ये जायचं असतं, अशा शाळांमध्ये 25 टक्के जागांची सक्ती केली. त्यामुळे शिक्षणासाठी सरकारचं प्राधान्य आहे. ज्या घटनेमुळे संभाजीराजे बोलले, त्याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन आणखी काय करता येईल हे पाहू” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संभाजीराजे काय म्हणाले होते?
आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते. उस्मानाबादच्या देवळाली गावातील मराठा समाजातील अक्षय शहाजी देवकर यानं आत्महत्या केली. दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, या भीतीने त्याने आत्महत्या केली. अक्षयला गणितात 99 मार्क्स होते. त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र दुष्काळ, घरची गरिबी आणि आरक्षण मिळत नसल्यानं प्रवेशात निर्माण होणाऱ्या अडचणी या तणावातून त्यानं आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा अशी आक्रमक भूमिका घेतली.
संबंधित बातम्या :
आरक्षण गेलं खड्ड्यात, आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष : संभाजीराजे
94 टक्के पडूनही आत्महत्या, देवकर कुटुंबीयांच्या घरी गेलेल्या संभाजीराजेंना अश्रू अनावर