मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या झोमॅटो या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ऑर्डर पोहोचवण्यासाठी निघालेला हा डिलिव्हरी बॉय वाटेतच पॅकिंग फोडून, स्वत:च त्यातील खाद्यपदार्थावर ताव मारतो, त्यानंतर तेच उष्टं अन्न संबंधित ग्राहकाकडे पुन्हा पोहोचवण्यासाठी रवाना होतो, असा या व्हिडीओतून अर्थ काढण्यात आला. या व्हिडीओनंतर नेटिझन्सनी झोमॅटोला चांगलं फैलावर घेतलं. सोशल मीडियातून झोमॅटोविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
This is what happens before u eat ur food from Zomato!! pic.twitter.com/XbiBe6lSHE
— nitesh rane (@NiteshNRane) December 10, 2018
चहूबाजूच्या टीकेनंतर झोमॅटोने प्रचंड खबरदारी घेतली आहे. झोमॅटोने या संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी केली. त्याआधी झोमॅटोने सोशल प्लॅटफॉर्म्सवर झाल्या प्रकाराची माफी मागितली. शिवाय त्या डिलिव्हरी बॉयला तातडीने काढून टाकण्यात आल्याचं झोमॅटोने जाहीर केलं.
We take food tampering very seriously.
For more details: https://t.co/hBApiTzmcI
— Zomato (@Zomato) December 10, 2018
“आम्ही अशा प्रकारच्या घटनांची गांभीर्याने दखल घेतो. जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो तामिळनाडूतील मदुराई इथला आहे. आम्ही त्याची दीर्घ चौकशी केली. यादरम्यान त्याची चूक असल्याचं आढळल्यानंतर आम्ही त्याला हटवलं आहे” असं झोमॅटोने सांगितलं.
झोमॅटोच्या या कारवाईनंतर काही लोकांनी ही शिक्षा फारच तीव्र असल्याचं म्हटलं आहे. एखाद्याने भूक लागली म्हणून अन्न खाल्ल्यास गैर काय असेही प्रश्न काहींनी विचारले आहेत. तर काहींनी या कारवाईचं समर्थन केलं आहे.
झोमॅटोकडून खबरदारी
या प्रकारानंतर झोमॅटोने आता पार्सलबाबत प्रचंड खबरदारी घेतली आहे. यापुढे आम्ही टेंपर प्रूफ टेपच्या पॅकिंगमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी सुरु करु. या पॅकिंगमुळे अन्नपदार्थ सहजासहजी उघडू शकणार नाहीत. जर पॅकिंग एकवेळ उघडलं तर पुन्हा पॅक होऊ शकणार नाही. शिवाय डिलिव्हरी बॉयना आणखी चांगलं प्रशिक्षण देऊ, असं झोमॅटोने म्हटलं आहे.