पुणे : कोंढवा परिसरात कांचन कम्फर्ट या बांधकाम कंपनीच्या एका इमारतीचं काम सुरु आहे. त्यासाठी बांधकाम कंपनीने इतर राज्यांमधून मजुरांना येथे आणले. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्यांच्या खोल्या बांधल्या. या खोल्या इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या खालच्या बाजूला खड्ड्यात बांधलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे 2 च्या सुमारास संरक्षण भिंत थेट मजूरांच्या शेडवर पडल्याने अनेक मजूर त्याखाली सापडले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी सोसायटीत राहणाऱ्या आम्हाला ‘खाली गेले, खाली गेले’, असा आवाज आला. तेव्हा आम्ही धावत खाली आलो. त्यावेळी त्यांच्यातील काही लोक भिंतीखाली गेलेल्या लोकांना वाचवत होते. सुरुवातीला खूप कमी माणसं असल्याचा अंदाज होता. मात्र, तेथे झोपलेल्या माणसांपैकीच एकाने त्यांच्यासोबत 15 चे 20 माणसे असल्याचे सांगितले. आम्हाला नेमके किती मजूर आहेत याची कल्पना नव्हती. या मजूरांना राहण्यासाठी तेथेच सुरक्षा भिंतीच्या बाजूला तात्पुरती जागा करण्यात आली. मात्र, कामामुळे हादरे बसून भिंतीला तडे गेले होते आणि त्यामुळेच रात्रीच्या वेळी पाऊस सुरु असल्याने भिंत कोसळली.
अन्य प्रत्यक्षदर्शींनीही रात्रीच्यावेळी मजूर झोपेत असतानाच ते चिरडले गेले, अशी माहिती दिली. तसेच घटनेनंतर पोलीस आणि अग्निशामक दलाने मोठे सहकार्य केल्याचंही उपस्थितांनी सांगितले.