माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला झाला. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे. या प्रकरणातील नवनवे खुलासे आता समोर येत आहेत. ज्यांनी बाबा सिद्दिकी यांची हत्या केली ते लोक पंजाबमधील एका तुरुगांत होते. तिथे त्यांची भेट ही बिष्णोई गँगच्या एका व्यक्तीशी झाली.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सामील असणाऱ्या चार पैकी तीनजण तुरुंगात एकत्र होते. तिथे बिष्णोई गँगच्या एका शूटरशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे तीनही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी या आरोपींना सुपारी मिळाली होती. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर 50 – 50 हजार रूपये त्यांना मिळणार होते. त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
महिनाभर आधीपासून हे आरोपी मुंबईत राहात होते. 2 सप्टेंबरला मुंबईतील कुर्ला भागात या तिघांनी घर भाड्याने घेतलं. 14 हजार रूपये भाडं देत हे आरोपी कुर्ल्यात राहू लागले. त्यांनी अनेकदा बाबा सिद्दिकी यांचा पाठलाग केला. पण त्यांचा डाव फसला. पण काल नवरात्र उत्सवाची सांगता झाली. देवींच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. याच गर्दीचा फायदा घेत. फटाके वाजताच या आरोपींनी बाबा सिद्दिकी यांना गोळ्या घातल्या. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सिद्दिकी यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आणि आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवत आहेत. सध्या सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.