नवी दिल्ली: पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतात दहशतवाद्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन घाणेरडं राजकारण सुरु आहे. सुरुवातील तीनशे ते साडेतीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यांचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर शरद पवारांसह विरोधकांनी हल्ल्यातील मृतांचा नेमका आकडा सांगा, अशी मागणी केली. तर भाजप अध्यक्ष अमित शाहांनी अडीचशे दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त करतो, मुडदे मोजत बसत नाही, असं ठणकावून सांगितलं. तर त्याचवेळी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ज्या तळावर हल्ला केला, तिथे हल्ला करण्यापूर्वी 300 मोबाईल कार्यरत होते, अशी माहिती एनटीआरओने दिली.
या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध किंवा मिलिट्री हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले हे कसं मोजलं जातं, त्याची पद्धत काय? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
मृतदेह कोण मोजतं?
युद्धातील मृतांची संख्या कोण मोजतं? तर कोणीच नाही असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक जण अंदाज बांधतो. कोणत्याही युद्धात मरणाऱ्यांच्या संख्येचा कोणताही ‘प्रामाणिक’ आकडा नसतो. विशेषत: मोठी कारवाई झालेली असते त्यावेळी नेमका आकडा सांगणं कठीणच असतं. त्याबाबत केवळ अंदाज लावला जातो. जर हा संघर्ष दोन देशांमधील असेल तर हे आणखी अवघड होतं. कारण मरणाऱ्यांची संख्या मोजण्याची जबाबदारी स्थानिक संस्थांवर असते आणि या संस्था सरकारच्या मर्जीने काम करतात. म्हणजे जर सरकारला हा आकडा फुगवून सांगायचा असेल किंवा लपवायचा असेल, तर तसा अहवाल दिला जातो.
मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं असेल तर संयुक्त राष्ट्रासारख्या संस्था मृतांची आकडेवारी सांगतात, मात्र ती सुद्धा नेमकी आकडेवारी नसते.
मृतदेहांची मोजणी कशी होते?
दोन देशांच्या संघर्षाच्या परिस्थितीत मृतांची मोजणी ही दोघांच्या संयुक्त वापराद्वारे सक्रिय आणि निष्क्रिय निरीक्षणाद्वारे केले जाते. सक्रिय निरीक्षणामध्ये मृतदेहांची मोजणी किंवा घरांचा सर्व्हे केला जातो, त्यानंतर सॅम्पलिंग अर्थात नमुना तंत्रज्ञानाच्या मदतीने, किती लोक मारले गेले आहेत, हे निश्चित केलं जातं.
दुसरी पद्धत म्हणजे पॅसिव्ह अर्थात निष्क्रिय निरीक्षण पद्धती होय. यामध्ये मीडिया, रुग्णालय, शवगृहासह अन्य कायदेशीर संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीचा समावेश असतो.
उदाहरणार्थ, यमनमध्ये जानेवारी 2017 पर्यंत युद्धातील मृतांची संख्या दहा हजार इतकी होती, असं संयुक्त राष्ट्राने रुग्णालयाच्या रिपोर्ट्सवरुन सांगितलं होतं.
अडचणी काय?
माहिती कुठून मिळते त्यावर आकडे अवलंबून असतात. उदाहरणार्थ 1994 मध्ये रवांडात झालेल्या जातीय नरसंहारात मारले गेलेल्या लोकांची संख्या 5 लाख ते 10 लाखादरम्यान होती. दुसरीकडे इराकमध्ये आयसिसच्या हल्ल्यात किती लोकांचा जीव गेला याचा नेमका आकडाच नाही. केवळ ज्या संस्था आयएसला विरोध करत होत्या, त्यांनीच दिलेले आकडे अमेरिकेने मान्य केले.
कोणत्या युद्धात किती लोक मारले गेले, याबाबतचे आकडे वेगवेगळे असतात. कारण संबंधित देशांचे दावे वेगवेगळेच असतात. हे आकडे नेमकं कोण सांगतंय, त्यावर त्याची विश्वासार्हता अवलंबून असते.