अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे (Rekha Bhausaheb Jare Murder Case) यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. अहमदनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने हत्या करणाऱ्यांना पकडतानाच या हत्येमागील मुख्य सूत्रधाराचाही शोध लावला आहे. नगरचा पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. असं असलं तरी आरोपी बोठे सध्या फरार असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे. यानंतर आता बाळासाहेब बोठे कोण आहे याबाबतची चर्चा अहमनगरसह राज्यात होत आहे (Who is journalist Balasaheb Bothe involved in Rekha Jare Murder Case Ahmednagar).
बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.
बाळासाहेब बोठे याची आतापर्यंत तब्बल 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाळासाहेब बोठे याच्या या पुस्तकांपैकी 6 पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुद्दे आणि गुद्दे, पक्ष आणि निष्पक्ष, कानोकानी-पानोपानी आणि नेतृत्व मीमांसा ही 4 पुस्तकं पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडण्यात आली आहेत.
पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी देखील बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचाही एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले आहे.
नेमकं प्रकरण काय?
रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेतला आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं भासवण्यात आलं होतं. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला.
संबंधित बातम्या :
Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
व्हिडीओ पाहा :
Who is journalist Balasaheb Bothe involved in Rekha Jare Murder Case Ahmednagar