नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. या भ्याड हल्ल्याचे भारताने बेधडक असे उत्तर दिले. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला पाकिस्तानच्या सीमेवरील बालाकोट येथील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणावर करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या या कारवाईत दहशतवादी, प्रशिक्षक, कंमाडर आणि जिहादींना कंठस्नान घालण्यात आले आहे, भारतीय वायुसेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांनी आधीच या एअर स्ट्राईकची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना दिल्याची माहिती आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर 15 फेब्रुवारीलाच वायुसेना प्रमुख धनोआ यांनी एनएसएला दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर स्ट्राईक करण्याची योजना सांगितली होती. सूत्रांनुसार, हल्ल्यासाठी बालाकोट हेच ठिकाण निवडण्यामागेही एक महत्त्वाचे कारण होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची योजना दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बालाकोट येथेच आखली होती. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, बालाकोट येथे पाकिस्तानची सेना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते, जेणेकरुन ते भारतावर हल्ला करु शकतील.
बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) आणि पाकिस्तानी सेना दहशतवाद्यांना एलओसी पार करण्यासाठी बालाकोट येथे प्रशिक्षण देते. भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यानंतर बालाकोट येथे किती नुकसान झाले आहे, याबाबत सध्या भारतीय सुरक्षा संस्था अंदाज लावत आहेत. मात्र सीमेवर अद्याप पाकिस्तानी लष्कराकडून कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही.
भारताकडून पुलवामा हल्ल्याचा बदला
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. भारतीय वायुसेनेने बालाकोटच्या जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणावर हा हल्ला केला. या हल्ल्यात 300 ते 400 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.