आफ्रिकन देश केनियामध्ये वाढत्या कराविरोधात लोकांनी उठाव केला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेवर हल्ला करून अनेक ठिकाणी जाळपोळ सुरु केलीय. राजधानी नैरोबीमध्ये लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात 10 आंदोलकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या करविषयक विधेयकाला विरोध करण्यासाठी हे आंदोलक जमले आहेत. या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर जनतेवर अनेक प्रकारचे कर वाढणार आहेत.
आंदोलकांनी केनिया संसदेच्या काही भागांना आग लावली आहे. त्यांना आत जाऊ द्यावे म्हणून त्यांनी पोलिसांवरही हल्ले केले. पोलिसांनी त्यांना अडवल्यावर आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, आंदोलक अधिकच आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. यात दहा आंदोलकांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या गोळीबारानंतरही हजारो आंदोलक संसदेत दाखल झाले आहेत. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून खासदारांनी सभागृह रिकामे केले. नैरोबीमध्ये हे प्रकरण इतके वाढले की विरोधकांनी संसदेतील औपचारिक गदाही चोरून नेली. केनिया सरकारने एक वादग्रस्त वित्त विधेयक मंजूर केले आहे. जे लागू केल्यास देशातील कर वाढणार आहेत. तर, देशावरील कर्जाचा प्रचंड बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे सरकारचे म्हणणे आहे. या करांच्या माध्यमातून देशाला 2.7 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त रक्कम उभारायची आहे. केनिया देशाचे कर्ज इतके जास्त आहे की सरकारी तिजोरीतील 37 टक्के रक्कम केवळ व्याज भरण्यातच खर्च होते.
राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी दोन वर्षांपूर्वी निवडणूक जिंकली होती. मात्र, देशाची आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर त्यांनी हे विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला होता. केनियाच्या जनतेचा या विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध होता. पण, संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष रुटो यांनी पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी करत थेट संसदेवरच हल्लाबोल केला. राजधानी नैरोबी आणि इतर शहरांच्या रस्त्यावर आंदोलक आणि पोलिसांची चकमक झाली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधुर आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. मात्र, प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली.