माढा : लोकसभा निवडणुकीनंतर आता पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं पाणी फलटण, माळशिरस, सांगली आणि पंढरपूर या भागासाठी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन दिवसात अंमलबजावणी करणार असल्याचंही ते म्हणाले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयी झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी दुष्काळी सांगोल्यात उपाययोजना बाबत प्रशासनाची बैठक घेतली. कालवा समितीने 40 टक्के पाणी बेकायदेशीरपणे बारामतीला दिले असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला. बारामतीचे पाणी रद्द करण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं. फलटण येथे काल टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बारामती आणि इंदापूरला निरा डाव्या कालव्याचं आवर्तन बंद केल्याने फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष होतोय की काय? पाण्यासाठी आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीतही पाण्याचा मुद्दाच गाजला होता. सांगलीतील काही भाग आणि माढा मतदारसंघातील काही तालुके नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात.
रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरच भाजपात प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांनी पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले होते. आता निवडून आल्यानंतर निंबाळकर पाणीप्रश्नासाठी कामाला लागले आहेत.
दुष्काळी उपाययोजना बैठकीत टँकर वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर अधिकाऱ्यांची माहिती आणि तक्रारदाराची माहिती जुळत नसल्याने जर टँकर घोटाळा होत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या.