सातारा : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती इत्यादीमुळे ग्रामीण भागात शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई कायदा आणि योग्य ती आर्थिक तरतूद करुन एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना (Udayanraje letter to government for farmers help) मदत करावी. जर या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचे नेतृत्व करणार, असं उदयनराजेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. माजी खासदार उदयनराजेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Udayanraje letter to government for farmers help) भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी केली. तसेच विमा योजना तातडीने लागू करावी, कोलमडलेल्या शेतकरी-बळीराजाला शासनाने योग्य ती मदत देऊन धीर द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली.
यामागण्यांची पूर्तता झाली नाही तर, शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्याने, उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व वेळप्रसंगी आम्हाला करावे लागेल तरी आम्ही करु असाही इशारा उदयनराजेंनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवताना राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनात उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, यावर्षी ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागात विशेष करुन सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये फार मोठा पूर आला. त्यामुळे शेती पीकांचे-जनावरांचे, शेतकऱ्यांचे साधन संपत्तीचे, ग्रामीण भागातील 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. या पूरपरिस्थिती दरम्यान सार्वत्रिक निवडणुका लागल्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहीला.
हातातोंडाला आलेली पिके, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कापूस, आलं, बटाटे, कांदा, टॉमॅटो, डाळी, द्राक्ष, डाळींब, केळी, भाजीपाला या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मिड खरिपाची पिकेही गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग, पूर्ण कोकणपट्टा या भागात खाण्याच्या पिकांबरोबर, उसपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्याप्रमाणे माणसात रोगराई पसरती, त्याप्रमाणे पिकांची रोगराई पसरली आहे. ग्रामीण भागातील सर्व छोटे व्यावसायिक एकतर पुराच्या पाण्यात गेले किंवा आर्थिकदृष्टया ग्रामीण भाग उध्वस्त झाल्याने, त्यांचा धंदा बसला.
जी गोष्ट पिकांची तीच गाई-म्हेशी, शेळया-मेंढया आदी जनावरांची झाली. ग्रामीण भाग उध्वस्त झाला आहे. आम्ही दहा वर्षांपासून मागणी करत असलेल्या विमा योजनेची जर अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे हात पसरावे लागले नसते. अशा सर्व मुद्द्यांकडे उदयनराजे भोसले यांनी लक्ष वेधले असून खालीलप्रमाणे कालबध्द उपाययोजना सूचविल्या आहेत.
उदयनराजेंनी सुचवलेल्या उपाययोजना
1. नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे एकतर ड्रोनच्या माध्यमातुन करावा अन्यथा गावचे सरपंच आणि कृषीसहारूयक यांनी केलेला नुकसान भरपाईचा सर्वे हा गृहीत धरावा.
2. ही कार्यवाही एका आठवडयात पूर्ण करुन घ्यावी.
3. ज्या भागात नुकसान झालेले आहे, त्याभागात बँक, पतसंस्था इतर संस्था यांची पीक तसेच मुदत कर्जे यांच्यापासून शेतकऱ्यांना कायदयाने मुक्त करावे.
4. प्रतिएकरी कमीतकमी धान्य पिकांसाठी रुपये 30 हजार आणि कापूस, द्राक्ष, डाळींबे, उस आदी पिकांसाठी एकरी रुपये 60 हजारापर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.
5. सध्या पूर आल्यापासून ते अवकाळी पावसापर्यंत शेती, ग्रामीण भागातील उद्योग उध्वस्त झाल्याने प्रत्येक घरटी दोन माणसांना रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांच्याच शेतामध्ये जे जे दुरुस्तीचे काम करण्याची आवश्यकता आहे ती करण्यास सांगावी. ही उपाययोजना जून 20 पर्यंत करण्यास सांगावे, पुढचा खरीप हंगामाचे पीक येईपर्यत ही पध्दत सुरु ठेवावी.
6. जी जनावरे वाहुन गेल्याने, नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या बाजारभावाच्या किंमतीप्रमाणे प्रती जनावर 70 ते 80 हजार रुपये नुकसान भरपाई दयावी.
7. पुरामुळे, अवेळी पावसामुळे शेतक-यांच्या दुभत्या जनावरांचे 50 टक्के उत्पादन कमी झाले आहे आणि कोंबडया, पिकं इत्यादीवर रोगराई वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उत्पन्नाची नुकसान भरपाई करावी.
8. पूर आणि अतिवृष्टीने बाधित शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाच्या आरोग्याचा खर्च हा शासनाने कायदा आणि आर्थिक तरतुद करुन करावा.
9. हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतक-यांना कायदयाचा आधार नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडून आत्महत्तेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक दिवसाचं विशेष अधिवेशन ताबडतोब बोलावून, त्यावर चर्चा करुन, शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा कायदा आणि त्याची कार्यवाही सुरु करावी.जीवाभावाच्या शेतक-यांबरोबर आम्ही सदैव राहणार असून, त्यांनी धीर सोडू असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी निवेदनामध्ये नमुद केले आहे.