नागपूर : विदर्भातून संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडं मंत्रीपद होतं. परंतु, त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. तेव्हापासून विदर्भाला शिवसेनेनं मंत्रीपद दिलेलं नाही. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवसंपर्क अभियानानंतर (Shiv Sampark Abhiyan) मुंबईत हालचाली वाढल्या. विदर्भात मंत्रीपद देण्याबाबत संजय राऊत यांनी संकेत दिले होते. फडणवीसांच्या नागपूर जिल्हयात मंत्रीपद देण्याची शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी सेना विदर्भात मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. संजय राठोड यांच्यानंतर विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही. आता शिवसेनेच्या कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहवं लागेल.
विदर्भात निवडणुकीसाठी ताकद वाढावी म्हणून शिवसंपर्क अभियान सुरु झालंय. संसदेचं अधिवेशन सुरु असताना ते सोडून शिवसेनेचे सर्व खासदार शिवसंपर्क अभियानात आलेत. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे. विदर्भ भाजपचा गढ आहे. त्याच विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. आतापर्यंत युतीत विदर्भात भाजप जास्त जागा लढवत असल्याने शिवसेनेची ताकद कमी राहिली. विदर्भात सेनेचे चार आमदार, तीन खासदार आहेत. चार आमदारांपैकी एका आमदाराचे मंत्रीपद गेलं. आता तीन आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद मिळते, हे पाहावं लागेल.
शिवसेनेत वाद होते. पण, संजय राऊत नागपुरात आले. तीन दिवस त्यांनी मुक्काम ठोकला. नागपुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळं आता पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. विदर्भाच्या वाट्याला एखादं प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीमंडळात स्थान मिळाव, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर विचार करू. विदर्भाला प्रतिनिधीत्व देऊ, असं आश्वासन राऊत यांनी दिलं. त्यामुळं पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.