अहमदाबाद (गुजरात) : सध्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात तरुणांना पबजी गेमचं वेड लागलं आहे. सध्या हा गेम ट्रेडिंगमध्ये आहे. तरुणांना पबजी गेमचे इतके व्यसन लागलं आहे की, सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत तरुण मंडळी हा गेम खेळत असतात. या गेममुळे एका तरुणीने चक्क नवऱ्यासोबत घटस्फोटाची मागणी केली आहे. या तरुणीचे पबजी गेम खेळणाऱ्या एका मुलासोबत प्रेम झालं आहे आणि याच कारणामुळे तिने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट मागितला आहे. या तरुणीलाही पबजी गेमचे व्यसन लागलं आहे. अहमदाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय महिलेचे पबजी गेम पार्टनरसोबत प्रेम झाले. या कारणामुळे महिलेला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा आहे. यासाठी तिने राज्य महिला हेल्पलाईन अभयम (state women helpline abhayam) 181 वर ही कॉल करुन घटस्फोटासाठी मदत मागितली आहे.
“काही दिवसांपासून ही महिला सतत पबजी गेम खेळते. पबजी खेळताना तिची एका मुलासोबत ओळख झाली. महिलेप्रमाणे तो मुलगाही दररोज पबजी गेम खेळत होता”, असं काऊन्सलर सोनिया सगाथिया म्हणाली.
दरम्यान, पबजी पार्टनरसोबत बोलत असल्यामुळे महिला आणि तिच्या पतीमध्ये भांडण झाले. यानंतर महिला घर सोडून माहेर निघून गेली. माहेरी गेल्यानतंर या महिलेने घटस्फोटची मागणी केली. मात्र तिच्या नवऱ्याने घटस्फोटासाठी विरोध केला.
विशेष म्हणजे या महिलेचे गेल्यावर्षी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसोबत लग्न झाले होते. गेल्याच महिन्यात तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र आता ती आपल्या पतीसोबत घटस्फोट घेत आहे.
सध्या जगभरातील तरुणांनी पबजी गेमचे वेड लागलं आहे. या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं आहे. हा गेम खेळताना अनेकजण इतके मग्न होऊन जातात की, आपली तहान-भूकही विसरतात. पण पबजी गेममुळे तरुणांवर अनेक वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे. यामुळे हा गेम सध्या धोकादायक ठरत असून अनेकांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.