भोपाळ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Madhya Pradesh women walked in lockdown) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना 21 दिवस घरात राहण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत देशातील सर्व शाळा, खासगी कंपन्या, दुकानं आणि सार्वजनिक वाहतूक बंद केली आहे. या दरम्यान रस्त्यावर एकही वाहन नसल्याने मध्य प्रदेशातील एक महिला आपल्या एक वर्षाच्या बाळाच्या उपचारासाठी तब्बल 30 किमी चालत रुग्णालयात (Madhya Pradesh women walked in lockdown) पोहोचली.
माया देवीचे एक वर्षाचे बाळ गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते. पण गुरुवारी (26 मार्च) सकाळी अचानक त्याची तब्येत जास्त बिघडली. त्यामुळे माया आपल्या बाळाच्या उपचारासाठी चित्रकूट येथे 30 किमी पायी चालत गेली. या दरम्यान तिने रस्त्यात अनेक पोलिसांना मदतीची विनंती केली. पण कुणीही तिला मदत केली नाही. माया चित्रकूट जिल्ह्याच्या गुप्तगोदावरी येथील ऐंचवारा गावात राहते.
“गेल्या दोन दिवसांपासून माझा मुलगा आजारी होता. अचानक गुरुवारी त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे मी चालत चित्रकूट येथील रुग्णालयात आली. त्याच्यावर उपचार केले असून त्याची तब्येत आता ठिक आहे”, असं माया देवी यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशातही कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत 20 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.