मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर नीक जॉनस यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. आता बी टाऊनमध्ये पार्ट्या आणि रिसेप्शन सुरु आहे. पण लग्नानंतर हनीमूनला जाण्याबाबत प्रियांकाचं मत वेगळं आहे. काम ही आमची दोघांचीही प्रायोरिटी असल्याचं प्रियांकाने म्हटलं आहे. हनीमूनसाठी आम्ही पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्यातही जाऊ शकतो, असं ती म्हणाली.
नीक आणि प्रियांकाचं जोधपूरमध्ये 1 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने, तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न झालं. लग्नानंतर दिल्लीत रिसेप्शनही झालं. पण प्रियांका लग्नाशिवाय आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. प्रियांकाचं ग्लॅमर हेच चर्चेचं कारण ठरलं आहे.
फोर्ब्सच्या मासिकात प्रियांकाची विविध तीन प्रकारांमध्ये निवड करण्यात आली आहे. फोर्ब्सने प्रियांकाला मनोरंजन क्षेत्रातील सर्वात शक्तीशाली महिलेचा मान दिला आहे. या यादीत प्रियांका 16 व्या क्रमांकावर आहे. तर जगाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर प्रियांका जगातील मनोरंजन क्षेत्रातील शक्तीशाली महिलांच्या यादीत 94 व्या क्रमांकावर आहे.
एवढंच नाही, तर भारतातील सर्वात श्रीमंत 100 सेलिब्रिटींच्या यादीतही प्रियांकाचं नाव आहे. या यादीत प्रियांकाला 49 वं स्थान मिळालंय. प्रियांकाची कामाविषयीची समर्पकता हेच तिच्या यशाचं कारण आहे. लग्नाच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातूनही तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला येण्याच आश्वासन अगोदरच दिलेलं असल्यामुळे टाळू शकत नव्हते, असं तिने सांगितलं.
प्रियांका-नीकचा शाही विवाह सोहळा
प्रियांका आणि नीकच्या लग्नासाठी खास नियमावली बनवण्यात आली होती. कोणत्याही पाहुण्याला लग्नमंडपात आपल्यासोबत कॅमेरावाला मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घातली गेली होती. लग्न सोहळ्यादरम्यान पाहुण्यांना विना कॅमेऱ्याचा मोबाईल दिला गेला होता. जिथे प्रियांका-नीकचा लग्न सोहळा पार पडला ते उमेद भवन थ्री डी लायटिंगने सजवण्यात आलं होतं. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एकूण 64 आलिशान रुम्स, 22 पॅलेस रुम आणि 42 स्वीट्स बुक करण्यात आले होते. उमेद भवनचं चार दिवसाचं भाडं तब्बल 4 कोटी इतकं देण्यत आलं, असं सांगितलं गेलं.