नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरातील आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर असल्याचे उघड झाले आहे. प्रसूती झालेल्या महिलांना फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. शासकीय आरोग्यसेवेचेच असे तीनतेरा वाजल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसह सर्वच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
नर्सेसची कमतरता
नागपुरातल मेयो रुग्णालय हे गरिबांच्या उपचाराचं हक्काचं ठिकाण मानलं जातं. त्यामुळे नागपूरसह शेजारची राज्य आणि संपूर्ण विदर्भातून रुग्ण इथे उपचारासाठी येतात. मेयो रुग्णालयात एकूण 472 नर्सेसचे पदं मंजूर आहेत. त्यापैकी 70 पेक्षा जास्त नर्सेसची पदं सध्या रिक्त आहेत. नर्सेस कमी असल्यानं प्रसूती वॉर्डातील महिलांसाठी बेड टाकता येत नाही, असे मेयो प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
एका बेडवर दोन गरोदर महिला, प्रसूती झालेल्या महिला आणि बाळावर खाली फरशीवर टाकलेल्या गादीवर उपचार, अशी धक्कादायक दृश्य विकासाच्या गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभनीय नाहीत. एकीकडे राज्यात विकास होत असल्याच्या चर्चा केल्या जातात, मेट्रोचं जाळं विणलं जातंय, रस्त्यांचं जाळं विणलं जातंय, या सर्व बाबी खऱ्या असल्या तरी गरिबांचं जगणं-मरणं ज्या सरकारी रुग्णालयात ठरतं, त्या रुग्णालयातील सोई-सुविधांकडे प्राथमिकतेनं लक्ष देण्याची आज सरकारला खरी गरज आहे.